ठाणे महानगरपालिकेचा प्रकल्प ‘सारथी’

२२०० लोकांचे वैद्यकीय समुपदेश

रोज १०० लोकांना दिला जातो तज्ज्ञ डॅाक्टर्सकडून वैद्यकीय सल्ला

ठाणे – शहरातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी व्हावी, कोरोना सदृष्य लक्षणे असलेल्या रूग्णांची वेळीच चाचणी करून त्यांच्यावर औषधोपचार व्हावा आणि गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रूग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांचे वैद्यकीय समुपदेशन करावे यासाठी ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेला प्रकल्प ‘सारथी’ कोविड रूग्णांसाठी वरदान ठरत आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने ‘सारथी’ प्रकल्प अर्थात महापालिका कोविड कॅाल सेंटर कार्यान्वित करण्यात आला आहे.
या प्रकल्पातंर्गत रोज सरासरी १०० लोकांचे तज्ज्ञ डॅाक्टर्सच्या माध्यमातून वैद्यकीय समुपदेशन करण्यात येत असून आतापर्यंत २ हजार २०० लोकांचे वैद्यकीय समुपदेशन करण्यात आले आहे. यामध्ये २९ टक्के सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यात आले, २३ टक्के रूग्णांना रूग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी संदर्भांकित करण्यात आले, २० टक्के लोकांचे तज्ज्ञ डॅाक्टर्सच्यामाध्यमातून टेलिकौन्सीलिंग करण्यात आले तर १४ टक्के रूग्णांच्या आरोग्य स्थितीचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये शहरातील काही खासगी डॉक्टर्सदेखील टेलि कौन्सीलिंगसाठी निशुल्क सेवा देत आहेत.
शहरातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, गृह विलगीकरणांमधील रूग्णांचे योग्य वेळी समुपदेशन करून त्यांचे मनोबल वाढविणे, सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर आवश्यकता भासल्यास उपचार करणे, गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रूग्णांची प्रकृती खालावत असल्यास त्यांस रूग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी कोविड वॅार रूमला कळविणे आणि त्या रूग्णांवर वेळीच उपचार होतील याची दक्षता घेणे यासाठी २२ एप्रिल, २०२१ रोजी ‘सारथी’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.
रोज प्राप्त होणाऱ्या रूग्णांची माहिती, गृह विलगीकरणामध्ये असलेल्या रूग्णांची, कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांची माहिती या कोविड कॅाल सेंटरला पाठविली जाते. त्या माहितीच्या आधारे सारथी कोविड कॅाल सेंटरमधून प्रत्येकाला १५ दिवसांपर्यंत रोज कॅाल करून त्यांची माहिती घेतली जाते. त्यांच्या आरोग्याची माहिती घेवून त्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पुरविली जाते.
यासाठी महापालिकेच्यावतीने तज्ज्ञ डॅाक्टरांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. या डॅाक्टरांच्या मदतीने ज्या रूग्णांना वैद्यकीय सल्ला आणि समुपदेशनाची गरज आहे त्यांना टेलि कौन्सीलिंगच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यात येतो. ज्यांना किरकोळ उपचाराची गरज आहे त्यांच्यावर गृह विलगीकरणामधील रूग्णांवर उपचार करण्यात येतात, तर लक्षणे गंभीर स्वरूपाची वाटत असल्यास त्यांना रूग्णालयामध्ये दाखल करण्याविषयी महापालिकेच्या वॅार रूमला कळविण्यात येते.
या कॅाल सेंटरच्या माध्यमातून रोज जवळपास १०० लोकांशी संवाद साधून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येते. या कॅाल सेंटरच्या माध्यमातून १६ मे अखेरपर्यंत एकूण २२०० लोकांचे वैद्यकीय समुपदेशन करण्यात आले. 

 256 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.