नागरिकांनी याची नोंद घेण्याचे महापौर आणि आयुक्तांचे आवाहन
ठाणे – तौक्ते चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण उद्या दिनांक १८ मे,२०२१ रोजी पूर्णपणे बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार शहरात काल रात्रीपासून अतिवृष्टी सुरु आहे. तसेच वेगाने वारे वाहण्याची शक्यता व पर्जन्यवृष्टीची संभाव्यता लक्षात घेता लसीकरणासाठी घराबाहेर पडून नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व लसीकरण बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.
पर्जन्यवृष्टीच्या संभाव्यतेच्या पार्श्वभूमीवर वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता, धोकादायक इमारती, रस्त्यावर पाणी येणे, वृक्ष पडून वाहतुकीस अडथळा तसेच इतर संभाव्य धोक्याचा विचार करता लसीकरणात व्यत्यय येवू नये यासाठी उद्या लसीकरण पूर्णतः बंद करण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
520 total views, 1 views today