ठाणे – ठाणे शहरातंर्गत लसीकरण मोहिम अधिक व्यापक आणि गतीमान करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आता ५ लक्ष लस विकत घेण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ग्लोबल टेंडर काढून ही लस विकत घेण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेने सातत्याने कोवीड नियंत्रण मोहिम प्रभावीपणे राबविली आहे. विक्रमी वेळेत ११०० खाटांच्या ठाणे ग्लोबल हॅासेपीटलची उभारणी केली तसेच ११०० खाटांची क्षमता असलेले कोविड रूग्णालय पार्किंग प्लाझा येथे उभारले. व्होल्टाज येथेही ११०० खाटांचे रूग्णालय तयार अवस्थेत आहे. या रूग्णालयांच्या माध्यमातून ठाणे शहर आणि परिसरातील असंख्य रूग्णांवर उपचार करण्यात आले.
औषधे असोत किंवा ॲाक्सीजन असो या बाबतीत ठाण्याने नेहमीच स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल केली आहे. आता लसीकरण मोहिम गतीमान आणि व्यापक करण्यासाठी ठाणे महानगरपालिका मुंबईच्या धर्तीवर ५ लक्ष लसी विकत घेणार आहे.
राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी मुंबईप्रमाणे ठाणे महानगरपालिकेने ५ लक्ष लसी विकत घेण्याची सूचना केल्याच्या पार्श्वभूमावर ठाणे महानगरपालिकेने लस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात तात्काळ ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आरोग्य विभागाल्या दिल्या आहेत. सदर निर्णयामुळे ठाणे शहरातील लसीकरण मोहिम गतीमान होण्यास मदत होणार आहे.
447 total views, 1 views today