कोरोना होऊन गेलेल्या मधुमेहग्रस्त रुग्णांची वेळोवेळी साखर तपासणे हाच म्युकरमायकोसिस टाळण्याचा मुख्य उपाय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या खास व्हीसीची आयोजन
ठाणे – म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकार आणि राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रमुख तज्ञांनी कंबर कसली आहे. येत्या १००० दिवसांच्या आत म्युकरमायकोसिस नियंत्रणात आणण्याचा निर्धार वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार म्युकरमायकोसिसच्या उपचार पद्धतीची दिशा ठरवण्यासाठी एका खास व्हीसीचे आयोजन करण्यात आले होते.
म्युकरमायकोसिस हा नवीन बुरशीजन्य रोगाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकारपुढे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. त्याचा सामना करण्यासाठी डॉ. आशिष भूमकर यांच्यासोबत एक खास टीम तयार करण्यात आलेली आहे. यात डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ञ अशा डॉक्टरांची टीम एकत्र करण्यात आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या पुढाकाराने हे संकट आपण सगळे मिळून नक्की परतवून लावू, असा विश्वास श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे प्रामुख्याने मधुमेह ग्रस्त व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी दिसून येतात. त्यामुळे हा आजार वेळीच टाळायचा असेल तर अशा रुग्णाची वेळच्या वेळी साखरेची पातळी चेक करायला हवी असं मत राज्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केलं. तसेच जे रुग्ण २१ दिवसाहून जास्त काळ रुग्णालयात राहून गेले आहेत, अशा रुग्णांच्या नाकाची एंडोस्कोपी करावी अशी सूचना त्यांनी मांडली.
याशिवाय या रोगाचे पहिले लक्षण हे दातदुखी असल्याने अशी तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांचा त्वरित एक्सरे काढायला हवा अशी सूचना डॉ. संदेश मयेकर यांनी व्यक्त केली.
म्युकरमायकोसिस आजार बळावल्यानंतर राज्य टास्क फोर्समध्ये नियुक्त झालेल्या डॉ. आशिष भूमकर यांनी मधुमेहग्रस्त रुग्णांची साखर पातळी नियंत्रणात ठेवणे हाच यावरचा सोपा उपाय असल्याचे सांगितले. त्यासोबत कोविड झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशा रुग्णांवर उपचार करताना त्यांना भूल देणे हे देखील एक मोठं आव्हान असल्याचं डॉ. भूमकर यांनी सांगितलं.
म्युकरमायकोसिस हा रोग जुना असला तरीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर त्यांचे रुग्ण वाढायला लागले आहेत. यासाठी दुसऱ्या लाटेतला स्टेन कारणीभूत आहे का याचा देखील अभ्यास सुरू असल्याचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं. मात्र वेळच्या वेळी घेतलेले योग्य उपचार हे म्युकरमायकोसिस पूर्ण बरा करू शकतात यावर या तज्ञ डॉक्टरांचे एकमत झाले.
या वेबिनार मध्ये डॉ. संदेश मयेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. सतीश जैन, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह राज्यभरातील अनेक नामवंत डॉक्टर सहभागी झाले होते.
म्युकरमायकोसिस रुग्णाची लाईव्ह सर्जरी
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगावर चर्चा करण्यासोबतच डॉ. भूमकर यांनी या व्हीसीमध्ये आशा रुग्णाच्या सर्जरीचं लाईव्ह प्रात्यक्षिक देखील आयोजित केल होत. या व्हीसी मध्ये सहभागी झालेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ही सर्जरी नक्की कशी होणार याबाबत डॉक्टरांकडून सारी माहीती जाणून घेतली. त्यासोबतच या रोगावरील उपचारामधील अवघड बाबी देखील डॉक्टरांच्या टीमने त्यांच्या लक्षात आणून दिल्या.
344 total views, 1 views today