जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ञांचे मत
कृषी मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्यासह देशविदेशातील मान्यवरांचा सहभाग
मुंबई – कोरोनात्तर काळात जगभरात कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. कृषी पर्यटनातूनच पर्यावरण सुलभ आणि शाश्वत पर्यटन साध्य केले जाऊ शकते. वाढते नागरिकरण, कोरोनासारख्या आपत्ती, वाढते मानसिक ताणतणाव या पार्श्वभूमीवर कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला येत्या काळात मोठा वाव असून सर्व पातळ्यांवर प्रयत्न करुन येत्या काळात या पर्यटनाला चालना देण्याचा निर्धार चौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त (१६ मे) आयोजित दोन दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आज करण्यात आला.
राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्यासह देशविदेशातील मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत आज या परिषदेचा शुभारंभ करण्यात आला. परिषदेत पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक पांडुरंग तावरे, फिलीपिन्सच्या पर्यटन मंत्रालयाच्या माजी प्रधान सचिव डॉ. मिना गॅबोर, इंडियन ट्रस्ट फॉर रुरल हेरिटेज ॲण्ड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष एस. के. मिश्रा, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम आणि दक्षिण विभागाचे प्रादेशिक संचालक डी. व्यंकटेशन, नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर ॲग्रीकल्चर एज्युकेशन मॅनेजमेंटचे महासंचालक डॉ. पी. चंद्रशेखर, युएनडब्ल्यूटीओ (स्पेन) चे माजी संचालक डॉ. हर्ष वर्मा, इटलीचे डॉ. थॉमस स्ट्रीफेंडर, स्टीव्ह बॉर्गिया आदी मान्यवर सहभागी झाले होते.
देशात कृषी पर्यटन चळवळ सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. १६ मे हा दिवस “जागतिक कृषी पर्यटन दिन” म्हणून आता जगभरात सर्वत्र साजरा केला जातो. त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि बारामती येथील कृषी पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक कृषी पर्यटन परिषद २०२१” ही दिनांक १५ – १६ मे रोजी ऑनलाईन माध्यमाद्वारे आयोजित केली आहे. यंदाच्या परिषदेत “कृषी पर्यटन – महिला शेतकरी उद्यमशीलता विकास” अशी थीम आहे. यंदाच्या या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन परिषदेला अमेरिकेतील ओरेगॉन, इलिनॉय, व्हरमाँट या राज्यांतून तसेच इटली, युगांडा, दक्षिण आफ्रिका, फिलिपिन्स, स्कॉटलँड, स्पेन थायलंड या देशांतून शेतकरी, संशोधक, पर्यटन विशेष सल्लागार निमंत्रित केले आहेत. या परिषदेद्वारे कृषी पर्यटन विषयातील माहितीचा व ज्ञानाचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर महिला शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाच्या क्षेत्रात केलेल्या भव्य कामगिरीची माहिती मिळणार आहे. परिषदेत “जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार २०२१” देण्यात येणार आहेत.
कृषी मंत्री भुसे यावेळी म्हणाले की, राज्यात कृषी विभागाच्या ३० टक्के योजना या महिला शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचपद्धतीने कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी या क्षेत्रातील घटकांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे धोरण ठरवू. जगाच्या पाठीवर कृषी पर्यटनात करण्यात येत असलेल्या विविध प्रयोगांची माहिती या कृषी पर्यटन परिषदेतून मिळेल. राज्यातील कृषी पर्यटनाच्या विकासासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन मंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र कृषी पर्यटन धोरण जाहीर करुन राज्याने या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, त्याद्वारे इथे कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. इटली, स्पेनसह विविध युरोपीयन देश, अमेरिका आदी ठिकाणी कृषी पर्यटनात विविध प्रयोग केले जात आहेत. राज्यातही त्याच पद्धतीने कृषी आणि ग्रामीण पर्यटनाला मोठा वाव आहे. कोरोनोत्तर काळात या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पर्यटन राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या की, पर्यटन व्यवसायामध्ये रोजगार निर्मितीसह देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भर टाकण्याची क्षमता आहे. त्या अनुषंगाने राज्यात पर्यटनाच्या विविध क्षेत्रांना चालना देण्यात येत आहे. कृषी पर्यटन धोरण जाहीर केल्यानंतर राज्यात काही कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत. यातून त्यांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच इतरांना प्रेरणा मिळाली आहे. कृषी पर्यटनाच्या विकासासाठी यापुढील काळातही व्यापक उपाययोजना राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
कृषी पर्यटनाचे महत्व सांगताना पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह म्हणाल्या की, कृषी पर्यटन ही एक उभरती संकल्पना आहे, जिच्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर दूरगामी आणि सकारात्मक परिणाम होतो. शेती आणि पर्यटनाच्या संगमातून केवळ रोजगार संधीच निर्माण होणार नाहीत तर ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाला त्यामुळे चालना मिळेल. कृषी पर्यटनाला चालना देताना या क्षेत्रातील घटकांचे, विशेषत: महिलांचे कौशल्य विकास प्रशिक्षण करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक पांडुरंग तावरे म्हणाले की, कृषी पर्यटन धोरणाने महाराष्ट्रात कृषी पर्यटन विकसित व्हावे यासाठी होतकरू शेतकऱ्यांना उत्तम मार्ग दाखवला आहे. हे धोरण राबवल्यापासून संबंधीत शेतकऱ्यांना आपल्या रोजगारात २५ टक्के वाढ झाल्याचे अनुभवले. राज्यातील कृषी पर्यटन केंद्रांवर २०१८, २०१९ आणि २०२० साली अनुक्रमे ४.७ लक्ष, ५.३ लक्ष आणि ७.९ लक्ष पर्यटक भेट देऊन गेले. या पर्यटक भेटींमधून शेतकऱ्यांना ५५.७९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. पुणे, रायगड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये असे अनुभवायला आले की कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांच्या जीवनावर नव्हे तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागला आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील कृषी पर्यटन क्षेत्रातील 30 हून अधिक मान्यवर तज्ञ सादरीकरण आणि मार्गदर्शन करणार आहेत. World agri tourism day – WAD या फेसबूक पेजवर ही सत्रे लाइव्ह पाहता येतील.
344 total views, 1 views today