ठाण्यातील गृहसंकूलांमध्ये मोफत लसीकरण करावे भाजपाची मागणी

ठाणे – ठाण्यातील सामान्य व मध्यमवर्गीय नागरिकांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन, महापालिका व राज्य सरकारने संयुक्तपणे ठाण्यातील गृहसंकूलांमध्ये मोफत कोरोना लसीकरण करावे, अशी आग्रही मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोरोना आपत्तीच्या काळात ठाणेकरांच्या आरोग्य संरक्षणाची जबाबदारी महापालिकेचीच आहे, असे पवार यांनी नमूद केले आहे.
ठाणे महापालिकेने खासगी कार्यालये व गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीमेसाठी धोरण जाहीर केले आहे. मात्र, त्यात सशुल्क लसीकरणाची अट टाकण्यात आली आहे. या सशुल्क लसीकरणाला ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी विरोध दर्शविला आहे. ठाणे शहर हे सामान्य व मध्यमवर्गीयांचे शहर आहे. कोरोना आपत्तीमुळे वर्षभरापासून सामान्य नागरिकांचे संसार कोलमडले आहेत. तर अनेकांचा रोजगार हिरावला असून, हजारो नागरिकांच्या उत्पन्नात घट झाली. अशा परिस्थितीत ठाणे महापालिकेने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. साधारणपणे एका कुटुंबात चार ते पाच जणांचा समावेश असतो. त्यामुळे कोरोना लसीकरणासाठी किमान तीन ते चार हजारांचा खर्च परवडणारा नाही. लसीकरण न झाल्यास कोरोनाने जीव गमाविण्याची भीती, तर सशुल्क लसीकरण परवडणारे नाही, अशा कात्रीत सामान्य ठाणेकर अडकण्याची भीती आहे, याकडे ज्येष्ठ नगरसेवक पवार यांनी लक्ष वेधले आहे.
कोरोना आपत्तीसाठी ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. केवळ क्वारंटाईन शिबिरातील साहित्यासाठी जम्बो खरेदी केली. तर कोरोना हॉस्पिटल व क्वारंटाईन शिबिरातील जेवणासाठी तब्बल ५२ कोटी रुपयांचा खर्च करण्याची योजना आहे. त्याआधी वर्षभरात सुमारे ६ कोटी रुपये केवळ भोजनासाठी खर्च झाले. ठाणे महापालिकेने आतापर्यंत १५ लाखांहून अॅंटीजन टेस्ट मोफत केल्या आहेत. तसेच आरोग्य योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. ठाणेकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठाणे महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने मोफत लसीकरण गरजेचे आहे. अशा परिस्थितीत महापालिकेनेच पुढाकार घेऊन राज्य सरकारच्या सहकार्याने मोफत लस द्यावी. त्यासाठी ठाण्यातील गृहसंकूलांमध्ये मोफत लसीकरण शिबिरे घ्यावीत, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनाही पत्र पाठवून गृहसंकूलात मोफत लसीकरणाचा आग्रह धरला आहे.

 280 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.