घरोघरी जाऊन नोंदणी करण्याचा उपक्रम, प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाचा पुढाकार
मुंबई : कोरोनाविरूद्ध लढायचं असेल तर प्रत्येकाचं लसीकरण व्हायलाच हवं. आजच्या घडीला लस हेच एकमेव शस्त्र आहे, जे कोरोनापासून लोकांचे संरक्षण करू शकते. असे असतानाही लोकांमध्ये लसीबाबत असंख्य समज-गैरसमज आहेत. लस घेतल्यानंतर माणूस दगावतो. अशक्तपणा येतो. लस वृद्धांसाठी घातक आहे, अशी मतं आजही अनेकांची आहेत. आम्हाला काही झालेलं नाही आणि होणारही नाही, त्यामुळे आम्ही लस घेणार नाही, अशी म्हणणारी लोकंसुद्धा आहेत. तसेच लस कुठे मिळते, कधी मिळते, असे विचारणारीही माणसे आहेत. एकंदर समाजात लसीकरणाबाबत जागरूकता नसल्यामुळे या मोहिमेला आजही वेग लाभलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. लसीकरण ही केवळ स्वत:ची काळजी नसून राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून देण्यासाठी प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाने ” लसस्वी भव: ” ही मोहीम हाती घेतली आहे.
त्यांनी आपल्या कामगार नगरातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करीत प्रत्येकांना लसीकरण मोहिमेत सामावून घेण्याकरिता घरोघरी जाऊन प्रत्येकाची लसीकरण नोंदणीची मोहिम सुरू केली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे छोटेसे पाऊल टाकले आहे. भारतात लसीकरण मोहिमेला वेगवान करण्यासाठी सामाजिक संस्था, मंडळे, सेवाभावी संस्थांनी आपापल्या नगरात, चाळीत, बिल्डिंगमध्ये, वसाहतींमध्ये ही मोहिम राबविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही सौरभ मित्र मंडळाने या मोहिमेच्या माध्यमातून केले आहे.
भारताची लोकसंख्या १४० कोटींपेक्षा अधिक असूनही गेल्या १०० दिवसांत १४ कोटी भारतीयांनीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दुसऱ्या लाटेपूर्वी लोकांमध्ये लसीकरणाबाबत प्रचंड उदासीनताही दिसत होती. कुणात फारसे गांभीर्य दिसत नव्हते. तसेच अनेक समज-गैरसमजामुळे लसीकरणाबाबत सामान्यांच्या मनात भीती होती. लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करीत असली तरी ती यंत्रणा कमी पडतेय. परिणामता लसीकरणाकडे सामान्य नागरिकांची पाठच दिसतेय. लसीकरणाचा वेग वाढावा, सामान्यांमध्ये लसीकरणाबाबत असलेली भीती दूर व्हावी म्हणून सौरभ मित्र मंडळाने जनजागृती मोहीम राबविताना ज्यांनी अद्यापही लसीकरणाची नोंदणी केलेली नाही, त्यांची नोंदणी करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. करोनाला फक्त लसीकरणच रोखू शकते, त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करायलाच हवे, असे मंडळ आपल्या स्थानिकांना समजावून सांगताना लसीकरण हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य प्रत्येकाने प्राधान्याने बजवायलाच हवे, अशी जाणीव मंडळ नागरिकांना करून देत आहे.
आमचे मंडळ फार मोठे काही करीत नाहीय. आम्ही फक्त आमच्या नगरातील लोकांच्या लसीकरण नोंदणीची जबाबदारी घेतली आहे. ही जबाबदारी नसून हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ही भावना प्रत्येक मंडळाच्या-संस्थेच्या मनात आली तर केवळ लसीकरणाचाच वेग वाढणार नाही तर प्रत्येकाचा जीवही वाचणार आहे. लसीकरणासाठी सर्वच मंडळांनी आपापल्या विभागापुरता, नगरापुरता, बिल्डींगपुरताही सहभाग घेतला तर येत्या १५ ऑगस्टपूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झालेले असेल. हेच आमचे ध्येय आहे. या ध्येयाच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल आम्ही टाकलेय. आता इतर सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन सौरभचे सरचिटणीस मंगेश वरवडेकर यांनी केले आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांची ऑनलाईन नोंदणी करीत आहोत. लशींचा तुटवडा संपताच आम्ही लसीकरणाची वेळ आरक्षित करण्यासाठीही नागरिकांना सहकार्य करणार असल्याची माहिती वरवडेकर यांनी दिली.
778 total views, 1 views today