नियोजनबद्ध लसीकरणासाठी
प्रभागनिहाय केंद्रे वाढवा-आ. संजय केळकर
ठाणे – सध्या अपुऱ्या लसींमुळे लसीकरणाचे नियोजन कोलमडले आहे. केंद्राबाहेर गर्दी वाढत असून लसीकरणाचा वेग मंदावला आहे. कुणी लस देता का लस असा टाहो सध्या शहरात ऐकायला मिळत आहे. आगामी काळात लसींचा पुरवठा वाढणार आहे. अशावेळी नियोजनबद्ध आणि सुरळीत लसीकरणाचा ठाणेकरांना लाभ व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने प्रभाग निहाय केंद्रे वाढवावीत, अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांना केली आहे.
ठाण्यात ४५ वयोगटाच्या पुढील नागरिकांसह १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे, मात्र योग्य नियोजन नसल्याने लसींचा साठा संपून लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्राबाहेर रांगाच रांगा लागत असून तासनतास रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ठाणेकरांमध्ये संतापाचे वातावरण असून योग्य नियोजनाचा अभाव यामुळेच हा गोंधळ उडाला आहे, असे आमदार संजय केळकर यांनी म्हटले आहे.
लसीकरणासाठी पुरेशा लसी नसताना लसींची पळवा-पळवी, व्हीआयपी संस्कृती यामुळे लसीकरणात मोठा गोंधळ होत असून त्याचा फटका ज्येष्ठ आणि महिला वर्गास सर्वाधिक बसत आहे. विशेष म्हणजे ठाणे शहरातील लोक संख्येच्या तुलनेत लसीकरण केंद्रांची संख्या नगण्य आहे, परिणामी सुरू असलेल्या केंद्रांवर नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला असल्याचेही आ.केळकर यांनी सांगितले.
अशा बिकट परिस्थितीत आगामी काळात होणाऱ्या लस पुरवठ्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे राहणार आहे. पुरेशा प्रमाणात लस पुरवठा झाल्यावर त्याचा फायदा सर्व घटकांना होणे गरजेचे आहे. त्यामुळे सुरळीत आणि नियोजनबद्ध लसीकरणासाठी आधीच धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच प्रभाग निहाय केंद्रे सुरू केल्यास सर्वांना सहजरित्या लस मिळू शकेल, असे मत केळकर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.
423 total views, 1 views today