ठाणे – कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक प्लाझ्मा मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ लक्षात घेऊन भाजपाने सुरू केलेल्या प्लाझ्मा हेल्पलाईनमुळे आठवडाभरातच ३२ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. प्लाझ्मा हेल्पलाईनच्या माध्यमातून अतिदक्षता विभागातील रुग्णांना सहजपणे प्लाझ्मा मिळाला. यापुढील काळातही ठाण्यातील जास्तीत जास्त रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून अथकपणे प्रयत्न सुरू आहेत.
ठाणे शहरातील कोरोना रुग्णांसाठी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांच्या संकल्पेतून हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आठवडाभरापूर्वी उद्घाटन करण्यात आले होते. या हेल्पलाईनद्वारे ठाणे शहरातील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची प्लाझ्मासाठी होणारी धावपळ टाळण्याचा प्रयत्न होता. त्यानुसार गेल्या आठवडाभरात ३२ रुग्णांच्या नातेवाईकांकडून www.bjpthane4plasma.co.in या हेल्पलाईनवर प्लाझ्माची मागणी करण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पद्धतशीरपणे नियोजन करून त्यांना प्लाझ्मा मिळवून दिला, असे मयुरेश जोशी यांनी सांगितले. या हेल्पलाईनमार्फत प्लाझ्मा पुरविण्याबरोबरच प्लाझ्मा दान करणाऱ्या नागरिकांनाही मार्गदर्शन केले जात आहे. प्लाझ्मा मिळविण्यासाठी कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांबरोबर संपर्क साधला जात आहे, असे जोशी यांनी सांगितले. या कार्यात महात्मा गांधी ब्लड बॅंक व वामनराव ओक रक्तपेढीचे सहकार्य मिळत आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत प्लाझ्मा दान करणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे. त्यातच वाढत्या रुग्णांमुळे प्लाझ्मा मिळविण्यात अडचणी येत होत्या. ठाण्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीपर्यंत प्लाझ्मा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत होती. ती टाळण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोरोना साथ आटोक्यात येईपर्यंत भाजपाकडून नागरिकांना मदत केली जाईल, असे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सांगितले.
489 total views, 1 views today