माझा डॉक्टर’ उपक्रम एमएमआर रीजनमध्येही राबवणार

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सज्ज राहाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

ठाणे – कोरोनाची दुसरी लाट मुंबई, ठाणे, पुणे आदी प्रमुख शहरांमध्ये काहीशी ओसरताना दिसत असली तरी हलगर्जीपणा न करता तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहाण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देतानाच राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेला ‘माझा डॉक्टर’ हा उपक्रम एमएमआरमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे सोमवारी येथे स्पष्ट केले.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता जगभरातील तज्ज्ञांनी व्यक्त केली असून तिला सामोरे जाण्यासाठी नक्की काय उपाययोजना करता येतील, याबाबत  शिंदे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रशासनाला काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ‘माझा डॉक्टर’ ही संकल्पना राबवण्यासाठी जिल्ह्यातील फॅमिली डॉक्टरांची लवकरच बैठक घेऊन त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करावेत, याबाबत कोविड टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.  

सध्या कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत असले तरीही लवकरच कोरोनाची तिसरी लाट येईल, असे भाकीत देश-विदेशातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना जास्त प्रमाणात भेडसावेल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यासाठी उभे करावे लागणारे विशेष वॉर्ड, चाइल्ड व्हेंटिलेटर्स, त्यांच्यावर करावे लागणारे उपचार या सगळ्याबाबत या बैठकीत उहापोह करण्यात आला.

या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर यांच्यासह एमएमआर रीजन मधील सर्व  महानगरपालिकांचे आयुक्त, पोलिस अधिकारी व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

 404 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.