सिद्धार्थ ओवळेकर यांच्या प्रयत्नांना यश

रोझा गार्डनिया  आणि आनंद नगर केंद्रांवर नियमित लसीकरण होणार
सर्वच शाळा अन् गृहसंकुलात केंद्र सुरु करा- ओवळेकर

ठाणे – घोडबंदर पट्ट्यामध्ये मोजकेच लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत. मात्र, त्याठिकाणीही पुरेसा साठा येत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यावर मात करण्यासाठी घोडबंदर पट्ट्यातील शाळा, गाव, गृहसंकुले, क्लब हाऊस, पार्किंग स्पेस, मैदाने या ठिकाणी तात्पुरते लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे. दरम्यान, महापौरांनी या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रभाग क्रमांक एकमधील रोझा गार्डनिया  आणि आनंद नगर येथे दिवसआड लसीकरण करण्यात येत होते. आता या दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये दररोज लसीकरण सुरु करण्यास मान्यता दिली आहे.
घोडबंदर पट्ट्यात लसीकरण केंद्रांची संख्या मर्यादीत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपमहापौर नरेश मणेरा आणि गलिच्छ वस्ती सुधारणा समितीच्या सभापती साधना जोशी यांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये मोजक्याच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु असल्याने नागरिक लसीकरणापासून वंचित रहात आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरण पूर्ण होणे गरजेचे असल्याने केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबई पालिकेने मोठ्या सोसायट्या, गृहसंकुले, औद्योगिक वसाहती, बँक  आदी ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यासाठी खासगी रुग्णालयांशी करार केला आहे. याच धर्तीवर ठाणे महानगर पालिकेने घोडबंदर पट्ट्यातील शाळा, गाव, गृहसंकुले, क्लब हाऊस, पार्किंग स्पेस , मैदाने येथे मोकळ्या जागेत अशी मोहीम राबविल्यास अठरा वर्षांवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गर्दीदेखील होणार नाही., अशी विनंती ओवळेकर यांनी महापौरांकडे केली.
दरम्यान, घोडबंदर येथील लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी   दोन्ही लसीकरण केंद्रांवर दररोज लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये दिवसआड लसीकरण होत असल्याने गर्दीचे प्रमाण वाढीस लागले होते. त्यामुळे या दोन्ही केंद्रांवर दररोज लसीकरण सुरु ठेवावे,  अशी आग्रहाची मागणी ओवळेकर यांनी केली. त्यावर महापौरांनी रोझा गार्डनिया  आणि आनंद नगर येथील दोन्ही आरोग्य केंद्रांमध्ये दररोज लसींचा पुरवठा करुन लसीकरण करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.

 353 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.