18 ते 44 वयोगटासाठी रोज 5 वाजता नोंदणी; 45वरील वयोगटासाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईनसाठी केंद्राची निश्चितीठाणे – लसीकरणा मध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण हे पूर्णतः ॲानलाईन नोंदणीद्वारे होणार असून त्यासाठी आता रोज सायंकाळी 5 वाजता नोंदणीकरण आणि बुकिंग करता येणार आहे तर 45 वरील वयोगटासाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात येणार असून यापुढे टोकन पद्धत राहणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतखाली पार पडलेल्या सर्व पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सर्वपक्षीय गटनेते यांच्या बैठकीतही लसीकरणामध्ये सुसुत्रता आणण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतरही लसीकरणाबाबत काही तक्रारी महापौर तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत 18 ते 44 वयोगटामधील लसीकरणाच्या सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 2 ते 5 या दोन्हीही सत्रांसाठी रोज सायंकाळी 5 वाजता नोंदणीकरण करता येणार आहे. तर 45 वरील वयोगटासाठी ॲानलाईन आणि ॲाफलाईन या दोन्ही पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे. ॲानलाईनसाठी 7 केंद्रे निश्चित करण्यात येणार असून उर्वरित 37 केंद्रावर ॲाफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे. या सर्व केंद्रांची यादी रोज महापालिकेच्यावतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
45वरील वयोगटासाठी रोज सायंकाळी 5.30 वाजता ॲानलाईन नोंदणीकरण करता येणार आहे. तसेच ॲाफलाईन पद्धतीने ज्या केंद्रांवर लसीकरण होणार आहे त्या ठिकाणची टोकन पद्धत बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
438 total views, 1 views today