नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण

विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला
ठाणे – मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. या दौर्‍यामुळे ठामपा प्रशासनाच्या कामाचा फोलपणा उघडकीस आला आहे. आता नालेसफाई करताना अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांचा अंकुश या ठेकेदारांवर ठेवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे. तसेच, येत्या काळात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठामपाची नालेसफाईमधील भ्रष्टाचार आपण उघडकीस आणणार आहोत, असा इशाराही शानू पठाण यांनी दिला आहे.
विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे शहरातील नालेसफाईचा दौरा केला. या दौर्‍यानंतर ठाणे महानगर पालिकेचे प्रशासन कामाला लागले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 10 जून रोजी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसाचे आगमन होणार आहे. असे असतानाही नालेसफाई झाली नसल्याने शानू पठाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
आज या संदर्भात शानू पठाण यांनी, ‘आपल्या दौर्‍यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. आपला उद्देश हा ठाणेकरांना सुखसुविधा मिळवून देण्याचा आहे. त्यामुळे आपण प्रशासनाची पोलखोल करणार आहे. नालेसफाईच्या पाहणी दौर्‍यामध्ये नाल्यांची अवस्था किती दयनिय झाली आहे, हे उघडकीस आले आहे. ठेकेदारांना नालेसफाईचा ठेका देताना नियम आणि अटींचा वारंवार भंग केला जात आहे. त्यामुळे नालेसफाईचे त्रयस्थांमार्फत ऑडीट करण्यात यावे; नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांचा अंकुश ठेवावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, दरवर्षी नालेसफाईमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो. हा भ्रष्टाचार आपण डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आणणार आहोत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

 411 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.