रिक्षाचालकांच्या मदतीची घोषणा

एप्रिलमध्ये, मदतीला उजाडणार जून?

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी वेधले लक्ष

ठाणे –  लॉकडाऊनच्या काळात रिक्षाचालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा केवळ फार्स ठरली आहे. १३ एप्रिल रोजी मदतीची घोषणा झाली असली, तरी
प्रत्यक्ष मदत मिळण्यास जून उजाडणार आहे, याकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक व भाजपा रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. लॉकडाऊनच्या काळातच पैशांची गरज असताना केवळ घोषणा करून राज्य सरकारने फसवणूक केली आहे, असा आरोप वाघुले यांनी केला आहे.
राज्यात लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचालकांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याची घोषणा केली होती. मुंबई-ठाणे जिल्ह्यात सुमारे तीन लाखांहून अधिक परमिटधारक रिक्षाचालक आहेत. १ एप्रिलपासून राज्य सरकारचे निर्बंध व १५ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लवकर मदत मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आतापर्यंत एक रुपयाही मिळालेला नाही. सध्या आरटीओकडून रिक्षाचालकांचे बॅंकेतील खाते क्रमांक आधार कार्डला लिंक करण्याचे काम सुरू आहे. संबंधित काम पूर्ण होण्यास जून उजाडणार आहे. त्यानंतरच रिक्षाचालकांच्या खात्यात मदत मिळणार असल्याची अपेक्षा आहे, याकडे भाजपा रिक्षाचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले.
श्रेय घेण्यासाठी धडपड
रिक्षाचालकांना मदतीचे श्रेय घेण्यासाठी घाईघाईत घोषणा करण्यात आली. मात्र, त्याबाबत पूर्तता करण्याची कार्यवाही वेगाने केली जात नाही. आधारकार्ड लिंक करण्यातच दोन महिने उलटणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये केवळ श्रेय घेण्यासाठी रिक्षाचालकांना १५०० रुपये देण्याची घोषणा करण्यात आली, असा आरोप संजय वाघुले यांनी केला. रिक्षाचालकांना तत्काळ मदत देण्यासाठी परमिटनुसार थेट मदत द्यावी, अशी मागणी वाघुले यांनी केली आहे.

 358 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.