दि बा पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी दशरथ पाटील

ठाणे –  पाटील विमानतळ नामांतर सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी, अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांची निवड करण्यात आली. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय सभेत ही निवड करण्यात आली.
नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी दि बा पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीची स्थापन करण्यात आली. उरण येथील जासई या दि. बा. पाटील यांच्या गावात व दि. बा पाटील यांनीच उभारलेल्या काॅलेज कॅम्पसमध्ये ही सभा बुधवारी, ५ मे रोजी पार पडली.

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी, दि बा पाटील विमानतळ नामकरण सर्वपक्षीय संघर्ष समितीचे कार्य जोमाने व शिस्तबद्ध पद्धतीने चालविण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांची सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा ठराव सुचक म्हणून मांडला. तर या ठरावाला शेतकरी कामगार पक्षाचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी अनुमोदन देताना म्हटले की, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रश्न हा आता समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. अशावेळी दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सक्षमपमे चालविले जाईल. दशरथ पाटील यांनी अखिल आगरी समाज परिषद व स्थानिक जासई ग्रामस्थ मंडळ यांना एकत्र करुन त्यांच्या संयुक्तपणे बैठका आयोजित कराव्यात, असेही सांगितले. काॅग्रेसचे नगरसेवक दशरथ भगत व अखिल आगरी समाज परिषदचे उपाध्यक्ष मधू भोईर यांनीही अनुमोदन दिले.

अध्यक्षपदी निवड झाल्यावर बोलताना दशरथ पाटील म्हणाले की, दि बा पाटील यांचे नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सर्वपक्षीय बैठक आयोजित करणे, शरद पवार व खासदार कपिल पाटील यांच्यामार्फत केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांची बैठक आयोजित करणे यासाठी प्राथमिकता दिली जाईल. प्रारंभी विनंती, चर्चा, गाठीभेटी यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यास खास दिबा स्टाईलने आंदोलनाने हा प्रश्न धसास लावण्यात येईल. ठाणे, रायगड, पालघर या तालुक्यात गाव, तालुका व जिल्हास्तरावर युवाशक्ती आ. बरोबर घेऊन आंदोलनाचे रान पेटवले जाईल, असा ईशाराही दशरथ पाटील यांनी यावेळी दिला.

या सभेत उपस्थित असलेलेे भाजपचे नेते माजी खासदार जगन्नाथ पाटील, भाजप आमदार प्रशांत ठाकूर, भाजप समर्थक अपक्ष आमदार महेश बालदी, शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख बबन पाटील,  माजी आमदार मनोहर भोईर, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, सिडको प्रकल्पग्रस्त नेते मनोहर पाटील, काॅग्रेसचे नेते संतोष केणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अतुल भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील, अर्थतज्ज्ञ जे. डी. तांडेल, जेष्ठ पत्रकार दिपक म्हात्रे, अखिल आगरी समाज परिषदेचे उपाध्यक्ष मधू भोईर,  जेएनपीटीने विश्वस्त भूषण पाटील, दि बा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील,  दिपक पाटील,  मेघनाथ म्हात्रे, भूषण पाटील आदी सर्वपक्षीय पक्ष व संघटनांच्या नेतेमंडळींनीही दशरथ पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या ठरावाला पाठिंबा देऊन दि बा पाटील विमानतळ नामकरण लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला.

 461 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.