उपमुख्यमंत्र्यांकडे आमदार संजय केळकर यांची मागणी.
ठाणे – गेल्या दशकात राज्यात विशेषतः एमएमआरडी क्षेत्रात गृह संकुले मोठ्या प्रमाणात उभारली गेली आहेत. ठाण्यात अनेक गृह संकुलांमध्ये सोयी-सुविधांअभावी सर्वसामान्य रहिवासी हवालदिल झाले आहेत. या रखडलेल्या आणि अत्यावश्यक विकास कामांसाठी आमदार निधी वापरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
ठाणे शहरात गेल्या १० ते १५ वर्षात मोठ मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. यात पाच-पाच हजाराहून जास्त लोक वस्ती आहे. या काळात येथील रस्ते-ड्रेनेज यांची दुरावस्था झाली आहे. आर्थिकदृष्टया सक्षम नसल्याने या सोसायट्यांना विकास कामे करणे अशक्य आहे. परिणामी त्यांना अनेक अडीअडचणी आणि हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी आमदार निधी वापरण्याची परवानगी दिल्यास येथील हजारो नागरिकांना दिलासा मिळू शकेल, असे मत आमदार केळकर यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे.
सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनीवर आमदार निधीतून विकासकामे करता येतात. गृहसंकुले खासगी जमिनीवर असल्याने तेथे आमदार निधीतून मुलभूत सोयी- सुविधा देता येत नाहीत. येथे आमदार निधी वापरल्यास हजारो सर्वसामान्य कुटुंबांना त्याचा फायदा मिळू शकेल, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
ठाण्यातील अनेक गृह संकुलांची स्थिती दयनीय असून मूलभूत सोयी सुविधांसाठी त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे कर भरूनही येथील नागरीक, लहान -लहान रस्ते, ड्रेनेज आदी विकासकामांपासून वंचित राहत असल्याची खंत गृह संकुलांतील सर्वसामान्य रहिवासी व्यक्त करीत आहेत.
518 total views, 1 views today