प्राईम क्रिटीकेअर व्यवस्थापनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

भाजपा गटनेते मनोहर डुंबरे यांची मागणी

ठाणे – मुंब्रा-कौसा येथील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने अग्रि सुरक्षा उपाययोजना न करताच हॉस्पिटल सुरू ठेवल्याप्रकरणी हॉस्पिटलचे मालक, व्यवस्थापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. चौघा निष्पाप रुग्णांचे बळी जाण्याच्या घटनेला व्यवस्थापन दोषी आहे, असे डुंबरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

मुंब्रा-कौसा येथील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलला आग लागल्यानंतर अन्य हॉस्पिटलमध्ये हलविताना चार रुग्णांचा मृत्यू झाला. या हॉस्पिटलला अग्निशमन दलाचे अग्नि सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले नव्हते. संबंधित हॉस्पिटलला महापालिकेने दोन नोटीस दिल्यानंतरही, अग्नि सुरक्षेविना हॉस्पिटलचा कारभार सुरू होता. या प्रकरणात हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून अक्षम्य हलगर्जीपणा घडला. त्यामुळे चौघा रुग्णांना जीव गमवावा लागला. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटलचे मालक, व्यवस्थापकांवर मनुष्यवधाला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक डुंबरे यांनी केली.

`फायर एनओसी’ नसलेल्या
हॉस्पिटलची यादी जाहीर करा
ठाणे शहरातील अनेक हॉस्पिटले अग्नि सुरक्षा प्रमाणपत्राविना (फायर एनओसी) सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, त्याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. तर जनतेलाही माहिती नसल्यामुळे धोकादायक हॉस्पिटलांमध्ये दाखल व्हावे लागते. या पार्श्वभूमीवर जनतेला सतर्कता व सुरक्षिततता बाळगण्यासाठी अग्नि सुरक्षा प्रमाणपत्र नसलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटलची यादी जाहीर करावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

 497 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.