दिव्यांगांनी दिला जेलभरो आंदोलनाचा इशारा

ठाणे – मागील वर्षापासून दिव्यांगांकडून दिव्यांग निधीची मागणी केली जात आहे. मात्र, अद्यापही ही मागणी पूर्ण केली जात नाही. त्यामुळे येत्या 15 दिवसात दिव्यांग निधी न दिल्यास मुलाबाळांसह जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी संघटना संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेचे मोहम्मद युसूफ खान यांनी दिला आहे.
ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, मागील वर्षी 23 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यापासून आजतागायत म्हणजेच दुसर्या लॉकडाऊनपर्यंत दिव्यांगांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. अनेक दिव्यांग हे छोटामोठा व्यवसाय करुन आपला आणि आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत. जे दिव्यांग स्टॉल चालवित आहेत; त्या दिव्यांगांच्या स्टॉलवर स्टेशनरी, झेरॉक्स यासारख्या वस्तूंची विक्री होत असल्याने तसेच या सुविधा जीवनावश्यक श्रेणीमध्ये येत नसल्याने दिव्यांगांचे हे स्टॉल बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परिणामी, दिव्यांगांच्या घरात एकवेळचे अन्न शिजणेदेखील जिकिरीचे झाले आहे. सन 2020 मध्ये दिव्यांगांना अर्थसाह्य करण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात आले होते. त्यावेळी सुमारे 10 हजार लोकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, तेव्हापासून आजतागायत कोणत्याही प्रकारचे अर्थसाह्य देण्यात आलेले नाही.
केंद्र सरकारसह न्यायालयाने दिव्यांगांची उपासमार होऊ नये, यासाठी त्यांना अर्थसाह्य करावे, अशा सूचना केल्या आहेत. मात्र, या सूचनांची अंमलबजावणी अद्याप ठामपाकडून झालेली नाही. सन 2020 च्या आणि सन 2021 च्या अर्थसंकल्पात दिव्यांग निधीची तरतूद करण्यात आलेली असतानाही त्याचे वितरण करण्यात येत नाही. त्यामुळे दिव्यांगांना उपाशी मरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. याचा विचार करुन दिव्यांगांना तत्काळ निधीचे वाटप करण्यात यावे, अन्यथा, सर्व दिव्यांग आपल्या मुलाबाळांसह महामारी अधिनयम, 1897 चा भंग करुन जेलभरो आंदोलन करुन तुरुंगात जाणे पसंत करतील, असेही खान यांनी म्हटले आहे.

 159 total views,  4 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *