भरमसाठ बिले आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयाचे ऑडिट करुन दोषींवर कठोर कारवाई करावी : महापौर नरेश म्हस्के

ठाणे – कोविडबाधितांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी महापालिकेने खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय सुरू करणेस मान्यता दिलेली आहे. काही खाजगी रुग्णालये अत्यंत चांगले काम करुन रुग्णांना सेवा देत असले तरी काही रुग्णालये मेडिकल, पॅथॉलॉजीच्या नावाखाली भरमसाठ बिले आकारत असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहे. अशा रुग्णालयांची चौकशी करावी व त्यात ते दोषी आढळले तर त्यांच्यावर होणारी कारवाई ही गंभीर स्वरुपाची असेल असे सूचित करणारे पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले आहे.

 कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात महापालिकेने खाजगी रुग्णालयांना देखील कोविड रुग्णालय सुरू करणेस मान्यता दिली आहे. काही खाजगी रुग्णालये रुग्णांवर माफक दरात उपचार करुन चांगली सेवा देत आहेत, मात्र काही रुग्णालये महापालिकेने ठरवून दिलेल्या दराव्यतिरिक्त पॅथॉलॉजी, मेडिकल व इतर चार्जेसच्या नावाखाली भरमसाठी बिले रुग्णांना देत असल्याच्या तक्रारी महापौर नरेश म्हस्के यांना प्राप्त झाल्या आहेत. या घटनेची महापौर नरेश म्हस्के यांनी तातडीने दखल घेतली असून भरमसाठ बिले आकारणाऱ्या रुग्णालयांचे ऑडिट करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.
 मागील एक वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नागरिकांचा नोकरी व्यवसाय अडचणीत आला आहे. आजही कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात असला तरी आर्थ‍िक विवंचनेत असलेले नागरिक खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी जाण्यास धजावत नाही, परिणामी त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. महामारीच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार घेता यावेत या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेने खाजगी रुग्णालयांना मंजुरी दिली आहे. परंतु जर ही रुग्णालये नागरिकांची लूट करीत असतील तर हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.  वास्ताविक पाहता, शासनाने बिले आकारण्याबाबत दरपत्रक ठरवून दिले आहे, व याची माहिती संबंधित रुग्णालयांनी दिलेली आहे. असे असताना देखील शासनाच्या नियमास बगल देवून काही रुग्णालये भरमसाठ बिले आकारत आहेत, त्यांचे संपूर्ण ऑडिट करुन यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशा प्रकारे कारवाई झाल्यास संबंधित रुग्णालयांना भविष्यातही त्याचा त्रास होईल याची नोंद खाजगी रुग्णालयांनी घ्यावे असेही महापौरांनी सूचित केले आहे.

 446 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.