महाराष्ट्राच्या मुली उपांत्य फेरीत, तर मुले उपउपांत्य फेरीत गारद

 

४७वी कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, तेलंगणा-२०२१


सुर्यापेट, तेलंगणा : काल रात्री उशीरा झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी आंध्र प्रदेशचा पराभव करीत “४७व्या कुमार गट राष्ट्रीय स्पर्धेची” उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलांना मात्र साई (भारतीय क्रीडा प्राधिकरण) कडून उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. आज महाराष्ट्र विरुद्ध साई व हरियाणा विरुद्ध चंदीगड अशा मुलींमध्ये, तर साई विरुद्ध हरियाणा व उत्तर प्रदेश विरुद्ध तामिळनाडू अशा उपांत्य लढती होतील. त्यानंतर अंतिम लढती खेळविण्यात येतील.
सुर्यापेट तेलंगणा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशला ३८-२७ असे नमवित उपांत्य फेरी गाठली. सावध सुरुवात करीत पूर्वार्धात प्रतिस्पर्धी संघाचा अंदाज घेत १५-१३ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात मात्र आपल्या खेळाची गती वाढविली. आंध्र प्रदेशावर दोन लोण चढवित सामना ११गुणांनी आपल्या नावे केला हरजितसिंग कौरचा चढाई-पकडीचा अष्टपैलू खेळ त्याला मानसी रोडेची मिळालेली चढाईची,तर समृद्धी कोळेकरची मिळालेली पकडीची साथ यामुळे महाराष्ट्राने हा विजय साकारला. मुली विजय साकारत असताना महाराष्ट्राच्या मुलांनी मात्र साफ निराशा केली. महाराष्ट्राच्या मुलांना साई कडून २३-६३ असा पराभव पत्करावा लागला. साई पुढे महाराष्ट्राच्या मुलांचा टिकाव लागला नाही. मध्यांतराला ३१-१४ अशी आघाडी घेणाऱ्या साईने नंतर देखील तोच जोश व सातत्य कायम राखत ४० गुणांच्या मोठ्या फरकाने सामना खिशात टाकला. तेजस पाटील, आकाश रुडाले यांनी थोडा फार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो अत्यंत दुबळा ठरला. महाराष्ट्राच्या बचावात आज दमच दिसला नाही. साईचा बचाव तर भक्कम होताच, पण त्याच्या आक्रमणातही धारदारपणा दिसत होता. गतवर्षी देखील आपण साई कडून पराभूत झालो होत. त्याची पुनरावृत्ती झाली.
मुलींच्या अन्य उपांत्यपूर्व सामन्यात हरियाणाने राजस्थानला (५२-२०), चंदीगडने झारखंडला (४८-३२), साईने तामिळनाडूला (३०-२४) असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. मुलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात हरियाणाने चंदीगडला (४२-३३), उत्तर प्रदेशने पंजाबला (४१-३६) तर तामिळनाडूने हिमाचल प्रदेशला (३६-२१) असे नमवित उपांत्य फेरीत धडक दिली.

 343 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *