ठाण्यात मनसेला पुन्हा खिंडार

विभागाअध्यक्ष श्रुती महाजन यांच्यासह शेकडो महिलांचा भाजपमध्ये प्रवेश 

ठाणे  : अंतर्गत गटबाजीला कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे विधानसभेच्या विभागाध्यक्षा श्रुती महाजन – कोंगनोळीकर यांनी आज शेकडो महिलांसोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. गेल्या सहा महिन्यात ठाणे शहरात मनसेला सोडचिठ्ठी देणाऱ्या महाजन या पाचव्या पदाधिकारी आहेत. याआधीदेखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत विविध पक्षांची वाट धरली आहे. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मनसेच्या ठाणे विधानसभा विभागाध्यक्षा श्रुती महाजन – कोंगनोळीकर पक्षात १४ वर्षांपासून कार्यरत होत्या. २०१२ साली त्यांनी मनसेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक २४ मधून निवडणूकही लढवली होती. मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून महाजन यांनी आज मनसेच्या प्रभाग क्रमांक सहाच्या शाखाध्यक्षा लक्ष्मी चांदणे व शेकडो महिलांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अँड. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष सचिन मोरे, विलास साठ्ये आदी उपस्थित होते. भाजपच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून मी संघटनेत सामील झाले आहे. भविष्यात ठाणे शहरात तळागाळापर्यंत भाजपचे काम पोहचवण्यासाठी झटणार असल्याची प्रतिक्रिया श्रुती महाजन यांनी भाजप पक्षप्रवेशानंतर बोलताना दिली. त्यांच्यावर भाजप ठाणे शहर जिल्हा चिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून महाजन यांच्या भाजप प्रवेशाने मनसेमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

मनसेतील आऊटगोईंग सुरूच…
सहा महिन्यांपूर्वी मनसेचे सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष, मनविसे कार्यकारणी सदस्य ओंकार माळी यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट धरली. त्यांच्या पाठोपाठ मनसे शहरसचिव अनिल म्हात्रे, उप विभागाध्यक्ष प्रलय साटेलकर यांनी मनसेतून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. गेल्याच आठवड्यात मनसे मीरा – भाईंदर शहर अध्यक्षा अन्नू पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्या. मनसेतील आऊटगोईंग गेल्या काही महिन्यात थांबतच नसल्याने पक्षातील वरिष्ठांची डोकेदुखी वाढली आहे.

 1,100 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.