विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने केले घंटानाद आंदोलन

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवणे, अतिक्रमणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा असलेल्या विशाळगडावर पुरातत्त्व आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. हे सर्व अतिक्रमण हटवण्यासाठी, तसेच पुरातत्त्व खात्याला जाग आणण्यासाठी आज ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने १९ मार्च या दिवशी कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. याच मागणीसाठी राज्यभरातही ‘ऑनलाईन’ आंदोलनही करण्यात आले.
या वेळी कृती समितीचे समन्वयक किरण दुसे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, किशोर घाडगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे,  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे चंद्रकांत बराले आणि मलकापूर येथील रमेश पडवळ यांसह अन्य उपस्थित होते. या वेळी ‘विशाळगडावरील अतिक्रमण रोखा, शिवकालीन इतिहासाचे जतन करा !’ ‘विशाळगड अतिक्रमण मुक्त करा !’ ‘अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणार्‍या पुरातत्व खात्याचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या.विशाळगडावर ६४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. छत्रपती शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे, तेथे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता आहे, दर्ग्याचे आर्.सी.सी. बांधकाम झाले आहे.
या वेळी करण्यात आलेल्या मागण्या :  वर्ष १९९८ पूर्वीच्या नोंदी ग्राह्य धरून विशाळगडावरील उर्वरित सर्व बांधकामे आणि अतिक्रमणे एका महिन्याच्या आत शासनाने काढून टाकावीत. पुरातत्व आणि अन्य खात्याच्या अधिकार्‍यांवर गुन्हे नोंदवावेत. गडावरील ऐतिहासिक स्मारके, विविध नरवीरांच्या समाधी अन् मंदिरे यांचा कालमर्यादा ठेवून जिर्णोद्धार करावा. पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्राम लोकांसमोर येण्यासाठी याचे एक ऐतिहासिक भव्य स्मारक उभारण्यात यावे, तसेच गडाचे पावित्र्य भंग करणार्‍या गोष्टींवर (उदा. मद्यपान, मांसविक्री) आणि आरोग्यास हानी पोचवणार्‍या सर्वच गोष्टींना प्रतिबंध करावा, अशा मागण्या या आंदोलनाच्या माध्यमांतून करण्यात आल्या. 

 442 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.