विद्यार्थ्यांच्या मूळ शाळेतच दहावीच्या परिक्षा घ्या

आमदार संजय केळकर यांची शिक्षणमंत्र्यांना लेखी सूचना

ठाणे : कोविड संकटामुळे सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. दहावी आणि बारावी परिक्षा चांगल्या वातावरणात व्हाव्यात यासाठी आमदार संजय केळकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना लेखी सूचना केल्या आहेत. हा फॉर्म्युला वापरल्यास परिक्षा सुरक्षित आणि सुरळीत होतील, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या परिक्षा कोविडचा मोठा प्रादुर्भाव असलेल्या काळात होणार असल्याने चिंतेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. 
आमदार संजय केळकर यांनी दहावीच्या परीक्षेसंबंधी शिक्षणमंत्र्यांकडे विविध उपाययोजना सूचविल्या आहेत. तत्पूर्वी त्यांनी विविध शैक्षणिक संस्था, शाळा – कॉलज मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी-पालक यांच्याशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. त्यानुसार त्यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना काही सूचना केल्या आहेत. त्याची योग्य रीतीने अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थी व शालेय कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार केळकर यांनी शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात विद्यार्थ्यांच्या एकूणच सुरक्षिततेसाठी विद्यार्थी जेथे शिकत असेल त्या शाळेतच परीक्षा घेण्याचे सुचवले आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांपैकी किमान ५० टक्के प्रश्न हे निर्माण केलेल्या प्रश्न बँकेतील असावेत, दोन पेपरमधील तारखांचे अंतर दोन ते तीन दिवसांचे ठेवावे. रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परीक्षास्थळी परीक्षावेळी
सॅनिटायझेशनची व्यवस्था वा जबाबदारी तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपवावी, अन्यथा राज्य शासनाने त्याकरिता संस्थांना अनुदान द्यावे. तसेच सीबीएसई बोर्डाप्रमाणे १० वीच्या परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित शाळांना द्यावी. परिक्षेच्या तारखा राज्यभर एकच असाव्यात व स्थानिक संबंधित शाळेतील प्रश्नपत्रिका, मॉडेल प्रश्नपत्रिकांमधून एक निवडावी, असेही आमदार केळकर यांनी पत्रामध्ये सुचविले आहे.
दरम्यान कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा आवश्यक ते बदल करून परीक्षांबाबतचा संभ्रम दूर करावा व निकोप वातावरणात परीक्षा पार पाडाव्यात, अशी अपेक्षा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे.

 339 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.