सीजीएसटी अंतिम फेरीत

सत्यजित बच्छाव ठरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी

ठाणे : मुंबईच्या सीजीएसटी संघाने अंबरनाथ क्रिकेट अकादमीचा ५ विकेट्सनी पराभव करत ज्ञानराज स्पोर्ट्स आयोजित मर्यादित ४० षटकांच्या लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. भिवंडीतील सोनाळे मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अंबरनाथ क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिकुंन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फायदेशीर ठरला नाही. सीजीएसटी संघाच्या सत्यजित बच्छाव आणि सागर मिश्राच्या भेदक माऱ्यापुढे अंबरनाथ क्रिकेट अकादमीला २२ षटकात ८० धावाच करता आल्या. सत्यजितने २१ धावात ४ आणि सागरने १० धावात ३ विकेट्स मिळवल्या. यश चव्हाण आणि सोनू सहरावतने प्रत्येकी एक विकेट मिळवली. उत्कर्ष हजारे (२२), अतुल गौतम (१५) आणि संकेतने १२ धावा करत संघाला अर्धशतकी धावसंख्या उभारून दिली. या मर्यादित धावसंख्येचा पाठलाग करताना विजेत्या सीजीएसटी संघाला पाच विकेट्स गमवाव्या लागल्या. प्रतिक पाटलेच्या २९ आणि अखिलेश कुमारच्या २५ धावांमुळे सीजीएसटी संघाने १७ षटकात ८१ धावा करत विजय निश्चित केला. अंबरनाथ क्रिकेट अकादमीच्या सौरव सोरटेने २९ धावांत २ तर मोनेश शेलारने तेवढ्याच विकेट्स मिळवताना ११ धावा दिल्या. चार विकेट्स मिळवणाऱ्या सत्यजित बच्छावला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सत्यजित बच्छावसह कमल पास्सी, सागर मिश्रा आणि यश चव्हाण हे रणजीपटू सीजीएसटी संघातून या स्पर्धेत खेळत आहेत.

 388 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *