खेळाडू ग्रेसगुण सवलतीपासून वंचित

शासकीय दिरंगाई, लाॅकडाऊनची भीती, प्रस्ताव सादर करण्यास कमी कालावधी मिळाल्यामुळे खेळाडू हवालदिल

ठाणे : क्रीडास्पर्धेत भाग घेणा-या खेळाडूंना शासनाकडून सवलतीचे गुण देण्यात येतात. शासन निर्णय २० डिसेंबर २०१८ परिशिष्ट १ मधील नियम क्रमांक २ नुसार इयत्ता ६ वी ते १० व नियम क्रमांक ४ नुसार इयत्ता 6 वी ते १२ वी पर्यंत केंव्हाही जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळला असल्यास सवलतीचे गुण देण्यात येतात. २५ जानेवारी २०१९ च्या शुद्धी पत्रकानुसार जिल्हास्तर प्राविण्य ५ गुण, विभागस्तर सहभाग ५ तर प्राविण्य १० गुण, राज्यस्तर सहभाग १० / १२ तर प्राविण्य १५ गुण, राष्ट्रीयस्तर सहभाग १५ तर प्राविण्य २० गुण, आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग २० तर प्रावीण्यास २५ गुण दिले जातात. पण १० वी व १२ वीत असताना “किमान सहभागाची अट” नियम ३ व ५ मध्ये मात्र घालण्यात आली आहे. कोवीड १९ मुळे या वर्षी क्रीडा स्पर्धा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाने दहावी व बारावीत असताना स्पर्धेत किमान सहभागाची अट शिथील करून विनाअट या वर्षी खेळाडूंना ग्रेसगुण देण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर, महाराष्ट्र राज्य क्रीडा संघर्ष समिती, शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीचे वतीने क्रीडा आयुक्त, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, क्रीडा मंत्री सुनील केदार, शिक्षक आमदार कपिल पाटील, डॉ सुधीर तांबे, जयंत आसगावकर, विक्रम काळे, अभिजित वंजारी, शिक्षण सचिव, अप्पर सचिव यांना प्रत्यक्ष भेटीतून तसेच वेळोवेळी निवेदन देऊन करण्यात आली आहे. पण मागील दोन महिन्यात यावर निर्णय झाला नाही. ग्रेसगुणांचे प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी कमी राहीला असून मोठमोठ्या शहरात लाॅकडाऊनमुळे मागील वर्षी प्रमाणे प्रस्ताव वेळेत सादर होतील की नाही ही भिती आहे. खेळ सोडून इतर काही विषयांना सवलतीचे गुण देताना क्रीडागुणांसारखी दहावी-बारावीत सहभागाची अट नसून कोणत्याही वर्षी परीक्षा दिली तरी गुण मिळतात.मात्र ही क्रीडा गुणांसंदर्भात सहभागाची अट शिथील होणार की नाही या विवंचनेतून खेळाडू विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.
या वर्षी स्पर्धा होऊ शकल्या नसल्याने राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीवर पाणी फेरले गेल्याने वर्षानुवर्षाची मेहनत वाया गेल्याने अगोदरच खेळाडूत अस्वस्थता निर्माण झाली आहे, त्यातच सहभागाची अट शिथील न झाल्यास ग्रेसगुणांपासून खेळाडू वंचित राहतील व विद्यार्थ्यांत नैराश्य येऊन ऐन परीक्षा कालावधीत मानसिकता ढळून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने विना अट ग्रेसगुण द्यावेत अशी मागणी क्रीडा संघर्ष समितीचे राज्यसचिव अविनाश ओंबासे, महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, अमरावती महामंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे, समन्वय समितीचे सचिव ज्ञानेश काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आनंद पवार, बालभारती अभ्यासगटाचे राजेंद्र पवार, अॅथलेटीक्स संघटने चे राजेश जाधव, क्रीडा भारतीचे संजय पाटील, महाराष्ट्र छात्रसेनेचे प्रितम टेकाडे, मुख्याध्यापक महासंघाचे कैलास माने, राज्यसचिव राजेंद्र कदम, राज्य युवा अध्यक्ष मयुर ठाकरे, मुंबई शारीरिक शिक्षण युनिटचे जितेंद्र लिंबकर यांनी केली आहे.

 280 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *