विधान परिषदेत गृहमंत्री देशमुख तर विधानसभेत अनिल परब यांची माहिती
मुंबई : मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याच्या मागणीवरून त्यांच्यावर २०१ अन्वये खाली गुन्हा दाखल करून अटक करावी आणि पदावरून तात्काळ निलंबित करावे या मागणीवरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस तर विधान परिषदेत प्रविण दरेकर यांनी काल मंगळवारी मागणी लावून धरली. तसेच विधानसभेचे कामकाज होवू दिले नाही. मात्र आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर आपल्या मुळ भूमिकेत बदल करत सचिन वाझे यांना तात्काळ पदावरून दूर करण्याची मागणी केली. या मागणीनुसार वाझे यांना पदावरून दूर करत असल्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विधानसभेत अनिल परब यांनी मान्य करत त्यानुसार कारवाई करत असल्याचे जाहिर केले.
विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात वाझे यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांना अटक करण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांना पदावरून तात्काळ दूर करण्यात येत असल्याचे विधान परिषदेत जाहिर केले. गृहमंत्र्यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने भाजपा सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
तर विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत सचिन वाझे यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली. आम्हाला सभागृहाचे कामकाज चालवायचे आहे. अर्थसंकल्पावर चर्चा करायचीय असे सांगत वाझे यांना पदावरून दूर करावे असे स्पष्ट केले.
यावेळी भाजपाचे सर्व सदस्य मोकळ्या जागेत जमा होत मागणी करू लागले. त्यावर सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी वाझे यांना पदावरून दूर करण्यात येईल असे जाहिर केले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे असलेले जे काही पुरावे असतील ते पुरावे पोलिसांना देवून तपासात सहकार्य करावे अशी सूचनाही परब यांनी फडणवीस यांना केली. त्यामुळे भाजपाने वाझे यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेत बदल करून त्यांचे बदली करण्यावर सहमती दर्शवली.
699 total views, 1 views today