महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद

२५ व्या राष्ट्रीय रोडरेस सायकलिंग शर्यतीत महाराष्ट्राने ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ५ ब्रॉंझपदकांसह एकूण ४२ गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकाविला.

पनवेल : भारतीय सायकलिंग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या २५ व्या राष्ट्रीय रोडरेस सायकलिंग शर्यतीत महाराष्ट्राने ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ५ ब्रॉंझपदकांसह एकूण ४२ गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकाविला. हरयाणाला ३८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र महिलांच्या एलिट गटात उपविजेता राहिला, तर सब ज्युनियर गटात महाराष्ट्राने विजेतेपद मिळविले.
सब-ज्युनियर गटातील पूजा दानोळेच्या दोन सुवर्ण पदकांखेरीज महाराष्ट्राला महिलांच्या कुमारी गटात अंजली रानवडे आणि २३ वर्षांखालील मुलांच्या गटात १०० कि.मी. अंतराच्या मास स्टार्ट शर्यतीत सूर्या थाथू यांनी सुवर्णपदके जिंकून दिली.
थाथूने शर्यत२ तास २८ मिनिट २२.५१० सेकंदात पूर्ण केली. चुरशीच्या लढतीत त्याने कर्नाटकाचा गगन रेड्डी याला अवघ्या एका मिनिटाने मागे टाकले. गगन रौप्यपदकाचा मानकरी ठरला. गुजरातच्या सचिन शर्माने ब्रॉंझपदक मिळविले.
कुमारी गटात अंजली रानवडे हिने ३२ मिनिट ५८.१६९ सेकंद अशी वेळ देत २० कि.मी. अंतराची वैयक्तीक टाईम ट्रायल शर्यत जिंकली. तिने कर्नाटकची चैत्रा बोरजी आणि हरयाणाची मिनाक्षी या दोघींवर निर्विवाद वर्चस्व राखले. मोठ्या आघाडीसह तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
महाराष्ट्राने या स्पर्धेत सब-ज्युनियर गटात घवघवीत यश मिळविले. या गटात महाराष्ट्राने २ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ ब्रॉंझ अशी सर्वाधिक सात पदके पटकावली.
स्पर्धेत पुरुष एलिट विभागात पंजाबने विजेतेपद, तर सेनादलाने उपविजेतेपद मिळविले. महिला गटाता महाराष्ट्र उपिवेजेते राहिले. या विभागात रेल्वे विजेते ठरले. कुमार गटात हरयाणाने विजेतेपद, तर राजस्थानने उपविजेतेपद मिळविले. सब-ज्युनियर गटात महाराष्ट्रानंतर हरयाणा उपविजेते राहिले.

 1,323 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.