टिटवाळा, बनेली, आंबिवली, कल्याण, ठाकुर्ली तसेच डोंबिवली येथील ६५ पेक्षा अधिक युवती व महिला झाल्या होत्या सहभागी
कल्याण : सिद्धिविनायक युवा संस्था टिटवाळा यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी शिवसेना शाखा, टिटवाळा येथे युवती व महिलांना मोफत नेमबाजी या ऑलिंपिक खेळाचे अद्यावत प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रीडा प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमात टिटवाळा, बनेली, आंबिवली, कल्याण, ठाकुर्ली तसेच डोंबिवली येथील ६५ पेक्षा अधिक युवती व महिला सहभागी झाल्या होते. क्रीडा प्रशिक्षक व राज्य युवा पुरस्कार विजेते विनायक कोळी तसेच क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे यांनी सर्व सहभागींना नेमबाजी या ऑलिंपिक खेळ प्रकाराविषयी व क्रीडा साहित्याच्या वापरासंदर्भात तांत्रिक माहिती दिली.
क्रीडा प्रशिक्षक संतोष मुंढे, हर्षदा पाडेकर, गौरी तिटमे, आकांक्षा जाधव यांनी सर्व सहभागी युवती व महिलांना नेमबाजी करण्यासाठी सहकार्य केले. पहिल्यांदाच नेमबाजी करायला शिकल्यामुळे सर्व महिलांचा उत्साह द्विगुणित झाला होता. अशा स्वरूपाचे प्रशिक्षण टिटवाळ्यात नियमितपणे चालु व्हावे जेणेकरून ग्रामीण भागातुन अनेक युवक व युवती चांगले नेमबाज होतील अशी अपेक्षा देखील सर्व महिलांनी व्यक्त केली. सहभागी महिलांनी उस्फुर्तपणे प्रशिक्षण पूर्ण केले व सदर उपक्रमाविषयी सकारात्मक अभिप्राय नोंदवला.
या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जयेश वाणी, आनंद जाधव आणि राजेश एगडे आदी मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न होण्यासाठी किशोर शुक्ला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
692 total views, 1 views today