जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेनेचे कार्यक्रम उत्साहात

२७ फेब्रुवारी ते ८ मार्च असे तब्बल १० दिवस विविध कार्यक्रमाचे करण्यात आले होते आयोजन

नवी मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग ८७ मधील शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि महिला उपशहर संघटक सुनिता रतन मांडवे आणि शिवसेना शाखा क्रमांक ८७च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. २७ फेब्रुवारी ते ८ मार्च असे तब्बल १० दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नेरूळ सेक्टर २ मधील अभिनंदन हॉलमध्ये २७ फेब्रुवारी रोजी प्रभागातील महिलांसाठी केक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ७० महिला सहभागी झाल्या होत्या. मनिषा घाडगे आणि स्मिता शिवतरकर यांनी महिलांना केकचे प्रशिक्षण दिले. २८ फेब्रुवारी रोजी महिलांसाठी केकच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विभागातील २० महिला सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून अनिल चिकणे, जिसॉन अन्सारी यांनी काम पाहिले. यातील स्पर्धकांना तीन प्रथम केक बक्षिसे व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. २८ फेब्रुवारी रोजी प्रभागातील कोरोना योध्दा महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांना प्रमाणपत्र, गुलाबाचे फुल, भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमास शिवसेनेच्या नवी मुंबई जिल्हा महिला संघटक रंजना शिंत्रे या प्रमुख पाहूण्या व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमात ४० महिलांचा सत्कार करण्यात आला तर उर्वरित ३० महिलांचा घरोघरी जावून माजी नगरसेविका सुनिता मांडवे यांनी सत्कार केला. डॉक्टर, हवलदार, लॅब टेक्निशिअन, नर्स, सरकारी कर्मचारी, आशा वर्कर, शिक्षक, बॅक कर्मचारी अशा महिलांचा यात समावेश होता.
१ ते ८ मार्चदरम्यान नेरूळ सेक्टर ८ मधील पंचवटी गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात महिलांसाठी योगा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षक शितल निघोट यांनी योगा प्रशिक्षणात सहभागी झालेल्या ४० महिलांना प्रशिक्षण दिले. ५ मार्च रोजी प्रभागातील; चैतन्य हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ञाच्या माध्यमातून महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ६० महिला सहभागी झाल्या होत्या. डॉ. शैलजा पोतदार, डॉ. अनुजा तुंगेवर, डॉ. गौरी गोडसे, डॉ. अश्विनी कपूर आदींनी महिलांची तपासणी करून त्यांना उपचार व मार्गदर्शन केले. ६ मार्च रोजी शिवसेना शाखेत विभागातील महिलांना सकाळी १० ते सांयकाळी ६ या वेळेत मोफत मेंहदी मोफत काढून देण्यात आली. यात सुमारे २०० हून अधिक महिलांनी सहभागी होत मेंहदी काढून घेतली. ८ मार्च रोजी शिवसेना शाखेत ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना मोफत मेडिसिन तसेच आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर सांयकाळी शिवसेना शाखेसमोरच महिलांसाठी मोफत तुळस वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ५०० हून अधिक तुळशीच्या रोपांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिवसेना विभाग संघटक शलाका पांजरी, उपविभाग संघटक शुंभागी परब, शाखासंघटक जयश्री बेळे, कविता कुलकर्णी, जयश्री गोळे, सुनिता पाटील, स्मिता शिवतरकर, छाया वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

 376 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.