मास्क न वापरणाऱ्यां ३५७ जणांकडून १ लाख ७८ हजारांचा दंड वसूल

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेची कारवाई सुरूच  

कल्याण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क न वापरणाऱ्या ३५७ व्यक्तींकडुन गेल्या तीन दिवसांत १ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेञात कोरोना साथीच्या वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका अनेकविध प्रयत्न सातत्याने करीत आहे, या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महापालिकेच्या सर्व प्रभाग परिसरात सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क वा कापड परिधान न करणा-या व्यक्तींविरुद्ध दंडाची कारवाई महापालिकेने जोमाने सुरु ठेवली आहे.
गेल्या तीन दिवसांत केलेल्या या कारवाईत, मास्क वा कापड परिधान न केलेल्या ३५७ व्यक्तींना एकूण १ लाख ७८ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. आज देखील क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख ज्ञानेश्वर कंकरे यांच्या पथकाने स्टेशन परिसर आणि बाजारपेठ परिसरात मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत विविध दुकानांमध्ये जाऊन पालिकेच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत ज्या व्यक्तींनी मास्क नव्हता लावला त्यांच्याकडून दुपारपर्यंत सुमारे १४ हजारांचा  दंड वसूल करण्यात आला. मास्कची कारवाई करत असतांनाच रेल्वे स्टेशन समोरील दुकानांच्या अतिक्रमणावर देखील या पथकाने कारवाई करत दुकानाबाहेर लावलेले साहित्य  हटविण्यात आले.  
सध्‍याचा काळ हा लग्न सराईचा असल्यामुळे, बाहेर विशेषत: गर्दीच्या ठिकाणी कुठल्याही समारंभात वावरतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन तसेच मास्क अथवा कापड परिधान करणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

 333 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.