महिलांच्या योजनांना निधी नाही, मग गाडय़ांसाठी निधी आला कुठुन?


मृणाल पेंडसे यांचा ठाणे महापालिका प्रशासनाला सवाल सवाल

ठाणे : कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावर जसा परिणाम झाला तसाच शहरातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, विधवा आदींसह इतर व्याधी असलेल्या महिलांना देखील घराचा गाडा आखताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या योजनांचा या महिलांना फायदा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्या निधीला देखील पालिकेने कात्री लावली आहे. परंतु दुसरीकडे महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, प्रभाग समिती सभापती यांना नवीन वाहने खरेदीसाठी ७० लाखांचा चुराडा करण्यासाठी निधी कसा मिळाला असा सवाल भाजपच्या महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला आहे.
महापालिका हद्दीत मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची साथ सुरु झाली. ही साथ रोखण्यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावरही याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी प्रशासनाने काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला असून यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १२०० कोटी रु पयांनी कमी झाला आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचे महापालिकेकडून सांगितले जात आहे. परंतु असे असतांना ५-२-२ खाली गाडय़ा खरेदी करण्याची घाई मात्र सुरु आहे. अत्यावश्यक असलेल्या कामांचा ५-२-२ खाली समावेश केला जातो. मात्र वाहन खरेदी अत्यावश्यक कामात कशी मोडते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे कोरोनामुळे समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या महिलांच्या हालाखीची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पालिकेने या महिलांना त्यांच्या योजनांच्या माध्यमातून सहकार्य करणो गरजेचे आहे. परंतु तसे न करता गाडय़ा खरेदीचा घाट घातला जात आहे.
गाडय़ा खरेदी करण्यासाठी पालिकेकडे जर निधी असेल तर समाजातील या गरीब, दुर्बल महिलांसाठी जो निधी कमी करण्यात आलेला आहे. तो निधी देखील पूर्णपणे या महिलांच्या हाती द्यावा.अशी मागणी आयुक्त बिपीन शर्मा ह्यांच्या कडे केली असल्याचे भाजपच्या ठाणे महिला शहर अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी सांगितले.

 519 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.