वायू प्रदूषणाची मुंबईत आघाडी

मुंबईतील २५००० नागरिकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू

मुंबई : वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. अर्निबध विकासप्रक्रियेचं जाळे वाढत असल्यामुळे अपरिहार्य कारणांमुळे वायू प्रदूषण वाढत असल्यामुळे  अनेक शहरांची घुसमट होते आहे भारतातील अनेक शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणाची पातळी मर्यादेबाहेर गेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता असून, भारताने हवेच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दोन वर्षांपूर्वीच दिला होता. दोनच दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या ग्रीनपीस साऊथइस्ट आशियाच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये मुंबईमध्ये पंचवीस हजार मृत्यूसाठी वायू प्रदूषण कारणीभूत ठरले आहे. याविषयी अधिक माहिती देताना बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे  छातिरोग -फुफ्फुसविकारतज्ञ  डॉ. जिग्नेश पटेल सांगतात, ” भारतामध्ये मुंबई, दिल्ली, लखनौ, बंगलोर, हैद्राबाद व चेन्नई ही सहा शहरे सर्वाधिक प्रदूषित शहरे असून दिल्ली शहरात २०२० मध्ये ५४००० नागरिकांचा मृत्यू झाला असून मुंबईचा दुसरा नंबर आहे. मुंबईच नाही तर मुंबईच्या लगतची शहरे सुद्धा प्रदूषित आहेत यामध्ये ठाणे , नवी मुंबई, पनवेल पालघर शहरांचा समावेश आहे. मुंबई शहरात सुरु असलेले मेट्रोची कामे, नवीन बांधकामे, कारखान्यातून होणारे प्रदूषण व दुचाकी व चारचाकी  वाहनांची झालेली अमर्याद वाढ ही कारणे मुंबई व लगतच्या शहरांमध्ये वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. हिवाळ्यात हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढीस लागून अतिसूक्ष्म धूलिकण खाली येतात व  या धूलिकणांमध्ये हवेतील धूर व धुके मिसळल्यामुळे स्मॉग तयार होत असल्यामुळे इतर ऋतुच्या तुलनेत हिवाळ्यात वायू प्रदूषणामुळे मृत्युदर वाढतो असा निष्कर्ष आहे. जगातील प्रगत शहरांमध्ये हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी आधुनिक यंत्रणा उपलब्ध  असल्यामुळे उपाय योजना करण्यास सुलभ ठरते , भारतामध्ये सुद्धा अशा यंत्रणेची गरज आहे. वायू प्रदूषणामुळे घशाचे-श्वसनाचे विकार, सर्दी, खोकल्यामध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण अपेक्स हॉस्पिटल समूहाने केले आहे.”  कोरोनापेक्षा अधिक मृत्यू प्रदूषणामुळे होत असून २०१९ साली देशभरात प्रदूषणामुळे तब्बल १७ लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सादर केलेल्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल लॅन्सेट हेल्थ जर्नलमध्ये ही प्रसिद्ध करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे जेष्ठ जनरल फिजिशियन डॉ प्रदीप शेलार सांगतात, ” वायू प्रदूषणामुळे निर्माण होणारे कण इतके सूक्ष्म म्हणजे नॅनो असतात की ते शरीरात पेशींमध्ये जाऊन बदल करतात हे लक्षातही येत नाही. यामुळे अनेकदा काहींना कर्करोगांसारख्या विकारांना सामोरं जावं लागतं, अशी गंभीर बाब गेल्या काही वर्षांमध्ये ठळकपणे दिसून आली आहे. तसंच यामुळे मृत्युदरही वाढल्याचे प्रामुख्याने आढळून आले आहे. वायू प्रदुषण वाढल्याने फुफ्फुसासंबंधी आजारांमध्ये वाढ झाली असून सीओपीडी, लोअर रेस्पिरेटरी इंफेक्शन , फुफ्फूसाचा कर्करोग आणि इतर आजारांमध्ये ह्रदयविकार, स्ट्रोक, मधूमेह, लिओनेटल डिसऑर्डर,ब्रॉन्कायटिस, श्वसनाचे आजार, दम्याचे अ‍ॅटॅक असे आजार  वाढीस लागले आहे. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये म्हणजेच डोंबिवली, कल्याण, तळोजा- बोईसर येथे असलेल्या रासायनिक कारखान्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत आहे. “

 389 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.