संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर आणि इतरत्र भागातील हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांचे नातेवाईक, जबर जखमी होणाऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून दिल्यामुळे यशवंती घाणेकर यांना वाघवाली ताई अशी ओळख मिळाली होती.
ठाणे : ठाणे जिल्ह्यासह मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजात “वाघवाली ताई ” म्हणून परिचित असणाऱ्या यशवंती वसंत जामदार-घाणेकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर आणि इतरत्र भागातील हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांचे नातेवाईक, जबर जखमी होणाऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून दिल्यामुळे यशवंती घाणेकर यांना वाघवाली ताई अशी ओळख मिळाली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
सुरुवातीला कम्युनिस्ट पक्ष आणि नंतर स्वतःच्या श्रमिक मोर्चा आदिवासी विकास मंडळाच्या माध्यमातून यशवंती घाणेकर गेली ५१ वर्षे आदिवासी समाजासाठी विविध यंत्रणांशी लढा दिला होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणे हटवताना तिथल्या आदिवासी लोकांच्या घरावर शासकिय बुलडोझर फिरणार होता. त्यावेळी यशवंती घाणेकर यांनी वन जमीन कायदा अस्तित्वात येण्याच्या आधीपासूनच तिथे असणाऱ्या पाड्यावर आदिवासी रहात असल्याचे सप्रमाण मुंबई उच्चन्यायालयात सिद्ध केले होते. त्यावेळी त्यांचे म्हणणे मान्य करुन आदिवासींना तिथून हटविण्यास मनाई करत त्यांना तिथेच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर कापूरबावडी येथे नव्याने झालेल्या पोलिस स्थानकामुळे विस्थापित होणाऱ्या आदिवासींनाही त्यांनी अशाच पद्धतीने न्याय मिळवून देताना १४ दिवसाचे उपोषण केले होते. त्यांच्या या आंदोलनापुढे नमते घेत गृहमंत्रालयाने त्या आदिवासींना त्याच ठिकाणी वसवले होते. यशवंती घाणेकर यांची शोकसभा रविवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
572 total views, 1 views today