यंदाच्या अर्थसंकल्पात वस्तू सेवा करसंदर्भात केलेल्या तरतुदी विरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार
मुंबई : देशातील सुमारे ४० हजाराहून अधिक विविध व्यापारी संघटनांनी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) यंदाच्या अर्थसंकल्पात वस्तू सेवा करसंदर्भात घोषित केलेल्या तरतुदींच्या विरोधात २६ फेब्रुवारीला घोषित केलेला भारत बंद यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी केली आहे. हा बंद जास्तीत जास्त परिणामकारी होण्यासाठी निरनिराळ्या राज्यातील कॅटच्या राष्ट्रीय नेत्यांनी अनेक राज्यात दौरे करण्याचे निश्चित केले असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना सुरेशभाई ठक्कर म्हणाले कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतीया यांच्याकडे दिल्ली आणि उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रविण खंडेलवाल महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान आणि अंदमान निकोबार या राज्यांचा दौरा करणार आहेत. कॅटचे राष्ट्रीय चेअरमेन महेंद्र शाह आणि उपाध्यक्ष घनश्याम भाटी हे दक्षिणेतील राज्यांना भेट देऊन भारत बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर कॅटचे राष्ट्रीय उप कार्याध्यक्ष ब्रिजमोहन अग्रवाल हे ओरिसा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड या राज्यात जाणार आहेत. कॅटचे राष्ट्रीय चिटणीस सुमित अग्रवाल यांच्याकडे पंजाब, हरियाणा आणि चंदीगड तर राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याकडे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दुसरे उपाध्यक्ष नीरज आनंद यांच्याकडे जम्मू काश्मीर आणि लेह लडाखची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे सर्व पदाधिकारी १४ ते २३ फेब्रुवारीदरम्यान संबंधित राज्यांना भेटी देऊन भारत बंदला प्रतिसाद मिळवण्यासाठी जनसामान्यांत वस्तू सेवा करातील जाचक तरतुदींविषयी जागृती करतील.
कॅटचे सरचिटणीस प्रविण खंडेलवाल कर सल्लागार, सनदी लेखापाल, विविध आस्थपनाचे सचिव, लघुउद्योग, पेट्रोल पंप, थेट विक्री केंद्र, फेरीवाले, चित्रपटाशी संबंधित उद्योग महिला संघटनांच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांशी संपर्क साधून त्यांचा भारत बंदला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. याशिवाय ऑनलाईन विक्रेते, व्यापार संबधित निरनिराळ्या संघटनांनाही भारत बंद मध्ये सहभागी केले जाणार आहे.
545 total views, 1 views today