ठाण्यातील अनेक रस्ते खड्ड्यात; मात्र निधी लाटण्यासाठी चकाचक रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण



विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सकाळी आठ वाजता केली पाहणी

ठाणे :  एकीकडे ठाणे शहरातील अनेक भागांत खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्या भागात रस्त्यांची  दुरूस्ती केली जात नाही. मात्र, कॅडबरी  सिग्नल ते माजीवडा व्हाया फ्लाॅवर व्हॅली या सुस्थितीत असलेल्या रस्त्याचे कंत्राटदाराच्या फायद्यासाठी डांबरीकरण करण्यात येत असल्याचा प्रकार विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे पठाण यांनी रविवारी सकाळी आठ वाजता या कामाची पाहणी करून चौकशीची मागणी केली आहे.
ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये सध्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यांच्या दुरूस्तीची गरज असताना ठामपाच्या संबधित खात्याकडून लक्ष दिले जात नाही.  मात्र, बिटकाॅन या कंपनीच्या आर्थिक लाभासाठी ठामपाने पायघड्या अंथरल्या आहेत. कॅडबरी जंक्शन येथून  फ्लाॅवर व्हॅलीमार्गे माजीवडाच्या  दिशेने जाणाऱ्या चांगल्या सेवा रस्त्यावर पुन्हा डांबरीकरणाचा  घाट घातला आहे. त्यासाठी लाखो रूपये बिटकाॅन आणि कंत्राटदार गांधी यांच्यावर उधळण्यात येणार आहेत. 
ठाणेकरांच्या करातून ही उधळपट्टी होत असल्याने   विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी रविवारी सकाळी आठ वाजता या भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी सांगितले की, जनतेच्या करातून कंत्राटदाराच्या हितासाठी केली जाणारी ही उधळपट्टी आम्ही सहन करणार नाही. बिटकाॅन आणि गांधी यांच्या फायद्यासाठी ठामपाच्या अधिकाऱ्यांनी हे डांबरीकरण करण्याचे धोरण आखले आहे. त्यामध्ये संबधित अधिकाऱ्यांच्या टक्केवारीचाही समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त विपीन शर्मा यांनी  सदर अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी शानू पठाण यांनी केली आहे.

 496 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.