विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हीच देविदास हांडेपाटील यांना श्रध्दाजंली ठरणार : संदीप नाईक

गतसाली मे महिन्यात झाला होता मृत्यू, आमदार गणेश नाईक यांचे निकटवर्तीय असलेल्या देविदास हांडेपाटील अभ्यासू आक्रमक नगरसेवक म्हणून पाडली होती छाप

नवी मुंबई : देविदास हांडेपाटील यांनी प्रभागातील समस्या सोडविताना नवी मुंबई शहराच्या विकासाच्या, येथील सुविधांचा, समस्या निवारणाचा सातत्याने विचार केला आहे. सभागृहात तसेच स्थायी समितीमध्ये नवी मुंबईच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मते मांडली आहे. येत्या पालिका निवडणूकीत प्रभाग ४२ मध्ये विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हीच हांडेपाटील यांना खरी श्रध्दाजंली ठरणार असल्याचे प्रतिपादन नवी मुंबईतील ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी केले.
कोपरखैराणे सेक्टर २३ येथील महेश्वरी प्रगती मंडळाच्या हॉलमध्ये हांडेपाटील मित्र परिवाराचा कौंटूबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऐरोलीचे प्रथम आमदार संदीप नाईक बोलत होते. गणेश नाईकांचे कट्टर समर्थक म्हणून कोपरखैरणे नोडमध्येच नव्हे तर नवी मुंबई शहरात ओळखले जाणारे प्रभाग ४२ चे नगरसेवक देविदास हांडेपाटील यांचे गतसाली १८ मे रोजी निधन झाले. त्यावेळी कोरोना मोठ्या प्रमाणात असल्याने हांडेपाटील मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळूनही एकत्रित येता आले नाही. परस्परांशी सुंसंवाद साधता आला नाही. त्यापाठोपाठ काही दिवसांनी हांडेपाटील यांचे निकटवर्तीय सहकारी व प्रभाग ४२ चे भाजप वॉर्ड अध्यक्ष रत्नाकर आवटे यांचे निधन झाले. प्रभाग ४२ मधील हांडेपाटील मित्र परिवाराला पुन्हा दु:खाचा सामना करावा लागला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला देविदास हांडेपाटील, रत्नाकर आवटे यांच्यासह प्रभागातील मृत पावलेल्या सहकाऱ्यांना व हांडेपाटील यांचे सासरे विष्णु तांबे यांनाही यावेळी श्रध्दाजली वाहण्यात आली. यावेळी व्यासपिठावर माजी नगरसेवक शंकर मोरे, मुनवर पटेल, रवीकांत पाटील, शिक्षण मंडळाचे माजी सभापती रवी अय्यर, रॉबिन मढवी, माजी आरोग्य सभापती वैशालीताई नाईक, माजी नगरसेविका भारती पाटील, सायली शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी व हांडेपाटील यांचे सहकारी उपस्थित होते.
डम्पिंग ग्राऊंडचे हस्तांतरण करणे सोपी गोष्ट नाही. गोवंडी मानखुर्द, मुलुंड-भांडुप या ठिकाणच्या डम्पंग ग्राऊंडची समस्या त्या ठिकाणच्या लोकांना सोडविता आली नाही. कोपरखैराणेतील निवासी नोड वाढू लागल्यावर हे डम्पिंग ग्राऊंड हटविण्यासाठी ज्या ज्या लोकांनी लढे उभारले, त्यात हांडेपाटील यांची सतत महत्वाची भूमिका राहीलेली असल्याचे सांगून संदीप नाईक आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, हांडेपाटील व मी एकत्रच पालिका सभागृहात गेलो. हांडेपाटील सतत मला मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहीले. स्थायी समिती सभापतीपदी हांडेपाटील विराजमान होणार होते, पण त्यांनी त्यांचे श्रध्दास्थान असलेल्या गणेश नाईकांकडे माझ्या नावाची शिफारस केली. स्वत:कडे चालत आलेले स्थायी समितीचे सभापतीपद त्यांनी मला दिले. गणेश नाईकांच्या मुशीत घडलेले व आपल्या नेत्यावर बेफाम प्रेम करणारे हांडेपाटील हे नि:स्वार्थी नेतृत्व होते. आपल्या नेत्याच्या विचाराचे पालन करणे, नेत्याच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा करणे, सर्व विरोधात गेले तरी लोकसेवेबाबतच्या आपल्या तत्वात बदल न करणे. हांडेपाटील यांचा हा जीवनपट असल्याने गणेश नाईक यांच्या गळ्यातील हांडेपाटील हे खऱ्या अर्थाने ताईत बनले असल्याचे संदीप नाईक यांनी यावेळी सांगितले.
नवी मुंबईतील विविध धर्मियांना एकत्रित ठेवून शहराच्या विकासाचा गाडा हाकण्याचे कार्य गणेश नाईक यांनी साडे तीन दशके हाकला आहे. या शहराचे पालकत्व गणेश नाईक यांनी कृतीतून सांभाळले आहे. महापालिकेच्या कारभारात गणेश नाईकांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. मात्र कोरोना शहरात आल्यावर प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या अनुभवाच्या जोरावर गणेश नाईकांनी नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यात प्रशासनाच्याजोडीने महत्वाची भूमिका बजावली आहे. दर आठवड्याला पालिकेत जावून शहरातील कोरोनाचा आढावा घेताना प्रभागाप्रभागातील समस्या सोडविण्यावर भर दिला. गणेश नाईकसाहेबांसोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कोरोना काळात शहरवासियांची सेवा केली. यात कोठेही राजकारण न करण्याची नाईक यांच्या सूचना त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंगिकारली. या कार्याची दखल घेवून सकाळ वृत्तपत्राने नाईक यांचा विशेष सत्कार केला. नाईक यांनी या पुरस्काराचे व सत्कारचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले. हांडेपाटील व गणेश नाईक यांचे नाते गुरूशिष्याचे होते. विकासकामे करवून घेताना दादांचे हट्टी हांडेपाटील व त्यांच्या लोकसेवेचे हट्ट पुरविणारे दादा सर्वानी जवळून पाहिले असल्याचे संदीप नाईक यांनी यावेळी सांगितले.
प्रभागातील प्रत्येक समस्या सोडविताना व रहीवाशांना सुविधा पुरविताना हांडेपाटीलांनी सतत परिश्रम केले आहे. प्रशासनदरबारी आपल्या करड्या शैलीत एक जरब निर्माण केली होती. हांडेपाटील यांच्या जाण्याने त्यांच्या परिवाराहून जास्त नुकसान समाजाचे झाले आहे. येत्या पालिका निवडणूकीत हांडेपाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्याच विचारधारेचा लोकप्रतिनिधी आपणास सर्वाधिक मताने निवडून देवून त्यांच्या कार्याला श्रध्दाजंली वाहण्याचे आवाहन संदीप नाईक यांनी यावेळी केली.
यावेळी उपस्थित रहीवाशांनी आपल्या भाषणातून हांडेपाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी आपल्या प्रास्तविकपर भाषणातून स्थानिक रहीवाशांना यापूर्वी आपण हांडेपाटील यांच्यावर जे प्रेम केले, तेच प्रेम त्यांच्या परिवारावर कायम ठेवण्याचे आवाहन केले. सुनिकेत हांडेपाटील यांनी यावेळी आभाराचे भाषण केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जमलेली प्रभागातील स्थानिक गर्दी ही हांडेपाटील यांच्यावर विशेष प्रेम करत असल्याचे कार्यक्रमादरम्यान पहावयास मिळाली.

 418 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.