तन-अभिमन्यू यांच्यापुढे सुवर्ण पदकासाठी यश-तेजस यांचे आव्हान

जेएमडीवायसी पिकलबॉल ; ग्रीष्म-आदित्य यांचे कांस्य पदक

मुंबई : तन सिंग आणि अभिमन्यू शेखावत, तसेच यश गायकवाड आणि तेजस गायकवाड यांनी आपापल्या सामन्यात बाजी मारत चांडक ग्रुप – जेएमडीवायसी खुल्या पिकलबॉल स्पर्धेच्या मुलांच्या १६ वर्षांखालील गटाची अंतिम फेरी गाठली. त्याचप्रमाणे, ग्रीष्म मुळगांवकर आणि आदित्य सिंग झुंजार खेळ करत तिसरे स्थान पटकवले.
जल मंगल दीप यूथ क्लब (जेएमडीवायसी) आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच अखिल भारतीय पिकलबॉल संघटना (एआयपीए) आणि अमॅच्युर पिकलबॉल फेडरेशन यांच्या मान्यतेने बांगुरु नगर (गोरेगाव) जल मंगल दीप रहिवासी संकुलात ही स्पर्धा सुरु आहे. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात चुरशीचे सामने रंगले. तन सिंग आणि अभिमन्यू शेखावत यांनी तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात ग्रीष्म मुळगांवकर आणि आदित्य सिंग यांचा ११-८, ९-११, ११-९ असा पराभव केला. यासह त्यांनी अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे, यश गायकवाड आणि तेजस गायकवाड यांनी आक्रमक खेळ करताना हर्ष मुठा आणि अहमद खान यांचा सरळ दोन सेटमध्ये ११-४, ११-५ असा धुव्वा उडवला. रविवारी या गटाचा अंतिम सामना रंगेल.
त्याचवेळी, तिसऱ्या स्थानासाठी खेळविण्यात आलेली लढत तीन सेटपर्यंत रंगली. यामध्ये ग्रीष्म-आदित्य यांनी बाजी मारली असली, तरी त्यांना हर्ष आणि अहमद यांनी चांगलेच झुंजावले. पहिले दोन सेटमध्ये केवळ एका गुणाचे अंतर राहिले. दोन्ही जोड्यांनी प्रत्येकी एक सेट जिंकल्याने सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये गेला. यामध्ये ग्रीष्म-आदित्य यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. यामुळे दडपणाखाली आलेल्या हर्ष-अहमद यांच्याकडून चुका झाला आणि याचा फायदा घेत ग्रीष्म-आदित्य यांनी ११-१०, १०-११, ११-७ अशी बाजी मारत कांस्य पदक निश्चित केले.
शनिवारी मिश्र दुहेरी, महिला दुहेरी आणि पुरुष दुहेरीचे अत्यंत रोमांचक लढती रंगल्या. या तिन्ही गटांचे अंतिम सामने रविवारी खेळविण्यात येतील. त्याचप्रमाणे, ४० वर्षांवरील पुरुष दुहेरीची अंतिम विजेती जोडीही रविवारीच ठरेल.

 501 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.