तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत महिला उद्योजिकांच्या उत्पादनांचे प्रदर्शन
ठाणे : देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सची (कॅट) तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद नागपुरात होणार आहे. महिला उद्योजिकांच्या उत्पादनाचे प्रदर्शन हे या परिषदेचे वैशिष्ट्य असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना सुरेशभाई ठक्कर म्हणाले, ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान कॅटची राष्ट्रीय परिषद नागपुरात होणार आहे. या बैठकीत विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार असून व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रणनीती आखली जाईल. लोकल ते व्होकल, आत्मनिर्भरता आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित माहिती मिळावी या करता महिला उद्योजिकांच्या उत्पादन आणि वस्तुंचे प्रदर्शन या निमित्ताने आयोजित केले आहे. व्यवसायाशी निगडित विभिन्न कायदे, त्यातून उदभवणारे प्रश्न, वेळोवेळी बदलणारे वस्तू सेवा कराचे नियम, त्यामुळे व्यापाऱ्यांसमोर निर्माण होणारे प्रश्न, व्यवसायाकरता बँकांकडून कर्ज मिळवताना कराव्या लागणाऱ्या अडचणींचा सामना याबाबत या परिषदेत सखोल चर्चा होईल.
याशिवाय देशात व्यवसाय करत असलेल्या परदेशी ई कॉमर्स कंपन्यांचा मनमानी कारभाराविरुध्द ठोस पावले उचलण्याच्या दृष्टीने आणि देशातील रिटेल व्यापाऱ्यांना ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवर व्यवसाय करता यावा यासाठी भारत ई मार्केटवरही या परिषदेत चर्चा होऊन त्यादृष्टीने निर्णय घेण्यात येईल असे सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
508 total views, 1 views today