मोदी सरकारच्या या धोरणांमुळे सामान्य माणसाला जगणे नकोसे झाले आहे. आता पुन्हा आम्हाला अश्मयुगात नेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्याचा निषेध करण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले.
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून इंधन आणि गॅसची मोठ्याप्रमाणात दरवाढ होत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिलांनी चक्क चुलीवर खिचडी शिजवून केंद्र सरकारचा धिक्कार केला.
गेल्या काही दिवसांपासून देशातील महागाईचा दर प्रचंड वाढलेला आहे. दर आठवड्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. तर, इंधनाचेही दर प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडले आहे. याचा निषेध करण्यासाठी राज्यभर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहाराध्यक्षा सुजाता घाग यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे देशवासियांना महागाईचा भार सहन करावा लागत आहे. सदर आठवड्याला सिलिंडरचे दर वाढविले जात आहेत. मागील महिन्यात १९० रुपयांनी दरवाढ केल्यानंतर मागील आठवड्यात २५ रुपयांनी दरवाढ केली आहे. त्यातच आता एक लाखांची उत्पन्न मर्यादा असलेल्यांनाच शिधावाटप पत्रिका देण्यात येणार आहेत. म्हणजेच एक लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत. मोदी सरकारच्या या धोरणांमुळे सामान्य माणसाला जगणे नकोसे झाले आहे. आता पुन्हा आम्हाला अश्मयुगात नेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. त्याचा निषेध करण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आले आहे.
या आंदोलनात शशिकला पुजारी, ज्योती निंबर्गी, फुलबानो पटेल, स्मिता पारकर, सुरेखा शिंदे, हाजी बेगम शेख, कांता गजमल, अनिता मोटे, वंदना हुंडारे, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, सुवर्णा खिल्लारे, मनिषा भाबड, माधुरी सोनार, मिनाज शेख, गिता शिंदे, स्नेहल चव्हाण, संगिता लोहकरे, वनिता भोर, शितल लाड, सविता जाधव, शोभा चौरसिया, पुजा मोहिते, भावना दावडा, रुबिना शेख, कविता कदम, तबस्सुम तांबोळी आदी महिला सहभागी झाल्या होत्या.
554 total views, 3 views today