केंद्र सरकारच्या शैक्षणिक योजनेला हॅकर्सचा झटका, आमदार संजय केळकर यांनी केला भांडाफोड.
ठाणे : केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या देशातील अल्पसंख्याक विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती योजनेच्या यु डायस प्रणालीवर सायबर हल्ला झाल्याचे ठाण्यात उघडकीस आले आहे. ठाणे महापालिकेच्या काही शाळांसह शहरातील नामांकित शाळांच्या यु डायस प्रणालीवर १ली ते १० वी च्या विद्यार्थाची बोगस पटसंख्या दर्शवुन कोट्यवधीची शिष्यवृत्ती परस्पर लाटण्याचा हॅकर्सचा डाव होता. मात्र, ठाणे जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकाऱ्याच्या सतर्कतेने याचा भंडाफोड झाल्याची माहिती, ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आ. केळकर यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे विदयाधर वैशंपायन, आल्हाद जोशी, न्यू गर्लस स्कूलचे मुख्याध्यापक श्रीयुत. तुरुकमाने, भाजप शहर उपाध्यक्ष सीताराम राणे आणि भाजप अल्पसंख्याक सेलचे अरिफ बडगुजर उपस्थित होते.
अल्पसंख्याक विद्यार्थ्याना शैक्षणिक शुल्कात मदत म्हणुन केंद्र सरकारतर्फ दरवर्षी प्रती लाभार्थी १० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. प्रत्येक शाळेच्या यु डायसवरील पटसंख्येनुसार या योजनेचा लाभ दिला जातो. ठाणे जिल्ह्यात एकूण ६ हजार ४७८ लाभार्थी आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारांनी शाळांची यु डायस प्रणालीच हॅक करून विद्यार्थ्याची बोगस नोंदणी केल्याचे समोर आले. ठाण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू गर्ल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज या शाळेची पटसंख्या शुन्य (०) असूनही ५८८ विद्यार्थी शिकत असल्याचे दाखवल्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकारी पराडके या महिला अधिकाऱ्याने शाळेच्या मुख्याध्यापक व पीपल्स एज्युकेशन संस्थेला कळवले. सखोल तपासणीत ठाणे महापालिकेच्या आठ शाळांसह काही नामांकित शाळांच्या पटसंख्येतही हेराफेरी केल्याचे समोर आले. भामट्यांनी मुख्याध्यापकांच्या सह्यादेखील बोगस केल्या आहेत. ठाणे जिल्ह्यासह देशभरात जवळपास एक हजार कोटींचा हा घोटाळा असण्याची शक्यता असल्याने पीपल्स सोसायटीने आमदार संजय केळकर यांना कळवले. त्यानुसार, आमदार केळकर यांनी सोमवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यानुसार, जिल्हा परिषदेचा
शिक्षण विभाग अज्ञातावर गुन्हा दाखल करणार असुन आर्थिक गुन्हे शाखा व ठाणे पोलिसांचा सायबर सेल या फसवणुकीचा सखोल तपास करत आहेत.
544 total views, 1 views today