मुख्यमंत्र्यांचा आदेश : भाजपाचे किरीट सोमय्या, निरंजन डावखरे यांचे महापालिकेबाहेर ठिय्या आंदोलन
ठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उभारलेल्या विहंग गार्डन येथील बेकायदा बांधकामाप्रकरणी ठाणे महापालिकेने ठोठावलेला ११ कोटी रुपयांचा दंड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ २५ लाखांवर आणला आहे, असा खळबळजनक आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज येथे केला. या प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या अटकेच्या मागणीसाठी किरीट सोमय्या, भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले.
प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने विहंग गार्डन येथील बी १ व बी २ या इमारतींना वापर परवाना मिळालेला नाही. या इमारतींमधील ९ ते १३ मजले अनधिकृत असून, महापालिकेने २०१२ मध्ये ते पाडण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणी महापालिकेने ठोठावलेल्या दंडाची रक्कम ११ कोटी रुपयांपर्यंत पोचली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या अर्जानंतर दंडाची ११ कोटींची रक्कम केवळ २५ लाख रुपये करण्यात आली, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. या संदर्भात प्रताप सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेच्या मागणीसाठी भाजपाचे शिष्टमंडळ महापालिकेत आले होते. त्यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेण्याआधी मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनातून प्रताप सरनाईक यांच्या अटकेच्या मागणीबरोबरच ११ कोटी रुपयांच्या वसुलीची मागणी करण्यात आली. या आंदोलनात किरीट सोमय्या, निरंजन डावखरे यांच्याबरोबरच महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, नारायण पवार, मनोहर डुंबरे, अर्चना मणेरा यांच्यासह १५ ते २० कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नौपाडा पोलिस ठाण्यात नेले.


571 total views, 1 views today