डिक्कीच्या सीमा कांबळे,चित्रा उबाळे यांनी केले मुंबईच्या महिला उद्योजिकांना मार्गदर्शन, प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे यांची उपस्थिती
मुंबई : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या महिला विभाग प्रमुख सीमा मिलिंद कांबळे यांनी नुकतेच डिक्कीच्या साहाय्याने व्यवसाय वृद्धी कशी होऊ शकते या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली भैसने-माडे देखील उपस्थित होत्या. दरवर्षीप्रमाणे डिक्की संस्था यंदा देखील ८ मार्चला पुणे येथे जागतिक महिलादिन साजरा करणार आहे त्यानिमित्ताने जगभरातील व्यावसायिक उद्योजिकांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा यासाठी सीमा कांबळे आवाहन केले.
प्रत्येक महिला उद्योजिकेमध्ये कोणते गुण असले पाहिजेत, एकमेंकासोबत नेटवर्कींग करुन कसा व्यवसाय वाढविला पाहिजे, ‘पैसा, बाजारपेठ, मार्गदर्शन’ या त्रिसूत्रींविषयी महत्वाच्या गोष्टी त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये मुद्देसुद महिलांना सांगितल्या. कोरोना पश्चात उद्योग-व्यवसाय डबघाईस आले असता आपला उद्योग कसा वाढवावा या विषयावर बोलताना त्यांनी डिक्कीचा प्रवास कथन केला, तसेच पद्मश्री मिलिंद कांबळे यांची रोमहर्षक उद्योजकीय वाटचाल कथन केली. त्यांच्या या मार्गदर्शनाने नवीन उद्योजिका महिला प्रभावित झाल्या.
यावेळी डिक्कीच्या महिला विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षा चित्रा उबाळे म्हणाल्या कि, “डिक्की तुम्हाला काय देते किंवा काय देईल हा विचार करु नका, व्यवसाय घेणाऱ्यापेक्षा देणारे व्हा. तुमचा व्यवसाय सुद्धा चांगला होईल. डिक्की तुम्हाला तुमच्या व्यवसायात पुढे जाण्यासाठी संधी देते. महिला उद्योजिका म्हणून जे शासकीय लाभ मिळतात त्याचा आपल्या व्यवसायवृद्धीसाठी उपयोग करुन घ्या. असा मोलाचा सल्ला त्यांनी महिला उद्योजिकांना दिला.
वैशाली माडे कार्यक्रमासाठी पाहुण्या म्हणून नाही तर एक उद्योजिका म्हणून उपस्थित होत्या. स्वत:च्या गावातील महिलांकरिता उद्योग-व्यवसायाच्या संधी जाणून घेण्यासाठी त्यांनी या बैठकीस आवर्जून हजेरी लावली. या बैठकीस डिक्की मुंबई विभागाचे अध्यक्ष अरुण धनेश्वर, पंकज साळवे, सौरभ वडगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. डिक्कीचे संपूर्ण भारतात २७ हून अधिक शाखा असून १० हजार पेक्षा अधिक उद्योजक डिक्कीचे सदस्य आहेत. कार्यक्रमाचा समारोप वैशाली भैसने-माडे यांच्या गाण्याने झाला.
461 total views, 1 views today