सुरेखा भंडारे एकादश संघाचा मोठा विजय

पूनम राऊत, शाहीन अब्दुल्लाची शतकी भागीदारी

डोंबिवली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुनम राऊत आणि शाहीन अब्दुल्लाने पहिल्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर सुरेखा भंडारे एकादश संघाने संध्या अग्रवाल एकादश संघाचा सहा विकेट राखून पराभव करत क्रिकेट इन्स्टिट्यूट ऑफ डोंबिवली आयोजित महिला टी २० क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली. संघाला विजयाचा मार्ग मोकळा करुन देताना पुनम राऊतने ४४ आणि शाहीन अब्दुल्लाने ४९ धावा केल्या. डोंबिवली आणि परिसरात महिला क्रिकेटला चालना मिळावी म्हणून निळजे येथील जय हनुमान क्रिकेट मंडळाच्या सहकार्याने मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संध्या अग्रवाल एकादश संघाने २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १२३ धावा केल्या. सिमरन शेखने तुफानी फलंदाजी करताना ८ चेंडूत २९ धावा केल्या. सिमरनने दोन चौकार आणि ३ षटकार ठोकत उपस्थित प्रेक्षकांना खूष केले. त्यांच्या सारिका चाळकेने ३ चौकार मारत ३६ आणि नुजात परविनने ४ चौकरांनीशी २७ धावा केल्या. संध्या अग्रवाल संघाला मर्यादित धावसंख्येवर रोखताना सिद्धी पवारने ७ धावात ३ विकेट्स मिळवल्या. रेश्मा नायक, मंजिरी गावडे, शार्वी सावेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. या आव्हानाचा पाठलाग करताना पुनम आणि शाहीन अब्दुल्लाने १०१धावांची भागिदारी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. शाहीनचे अर्धशतक अवघ्या १ धावेने हुकले. शाहीनने पाच चौकारांसह ४९ धावा केल्या. तर पुनमने ३ चौकार आणि एक षटकार खेचत ४४ धावा केल्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय गायतोंडे यांची मोलाची मदत झाली.

 400 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.