पालघर जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी शासकीय लाभापासून वंचित


तीन दिवसीय दौ-यानंतर आमदार संजय केळकर यांची आघाडी सरकारवर टीका

पालघर : आदिवासीबहुल असलेल्या पालघर जिल्ह्यात आदिवासी बांधव आणि शेतकरी शासकीय योजना आणि  सेवा-सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप भाजपाचे पालघर जिल्हा प्रभारी आमदार संजय केळकर यांनी आयोजित पाहणी दौ-यानंतर केला.
यावेळी दौऱ्यात सोबत पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, सरचिटणीस सतिश जनाटे, सुशील अवसरकर, नगराध्यक्ष भरत राजपूत, माजी आमदार पासकल धनारे इत्यादी स्थानिक पदाधिकारी, नेते होते.
आमदार संजय केळकर यांनी नुकताच पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी आदी भागांचा तीन दिवसीय पाहणी दौरा केला. या दौ-यात त्यांनी शेकडो आदिवासी बांधव, शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. या भेटीत अनेक तक्रारींचा पाढा त्यांच्यासमोर वाचण्यात आला.
आदिवासी बांधवांना अद्याप खावटीची मदत मिळाली नसून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांनाही मदत मिळाली नाही. आरोग्य व्यवस्था ढासळली असून बोईसरसारख्या भागातही सरकारी रुग्णालय बंद असून गोरगरीबांना खाजगी रुग्णालयात खर्चिक उपचार करुन घेण्याची पाळी आली आहे. शिक्षण व्यवस्थेचाही बोजवारा उडाला असून जिल्ह्यातील १० पैकी फक्त तीन गटशिक्षणाधिकारी आहेत. त्यामुळे आदिवासी-शिक्षण यंत्रणेतही गोंधळ माजला असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. या बाबत प्राथमिक शाळा शिक्षकांच्या समस्याही जाणून घेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिका-यांची बैठक घेऊन चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात सुरु करण्यात आलेली भात खरेदी केंद्रे ही कागदावरच असून भात विक्री होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरु करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनाही बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील वाड्या -पाडे टँकरवर जगत असल्याचा आरोपही  केळकर यांनी केला. 
पालघर जिल्ह्यात नेटवर्क पुन्हा मजबूत करु
एकेकाळी एक खासदार, दोन आमदार, पालकमंत्री आणि जिल्हा परिषद होती. जिल्ह्यात पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी, कार्यकर्त्यांना पाठबळ आणि ताकद देऊन गाव – पाड्यापर्यंत पक्षाचे जाळे पसरवण्यासाठी या दौ-याचे आयोजन केले असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. तीन दिवसात जिल्ह्यातील एक हजारहून जास्त कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून बुथ स्तराचाही आढावा घेतला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अर्ध्याहून जास्त ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या असून आगामी निवडणुकीतही विरोधकांना दे माय धरणी ठाय करु, असा विश्वास आ. केळकर यांनी व्यक्त केला. ३० वर्षे पालघरसारख्या भागात केले आहे. त्यामुळे हा जिल्हा मला नवीन नसून लवकरच येथे अपेक्षित बदल दिसून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 359 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.