प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ठाणे, कळवा, डोंबिवली येथील पोलीस ठाण्यांत दिलेल्या निवेदनांतून केली मागणी
ठाणे : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज २६ जानेवारीच्या दिवशीच रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. यावेळी वापरले जाणारे प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजांची विटंबना पहावी लागते. तसेच यंदा दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. तरी, अनुमती नसतांना जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकचे ध्वज किंवा तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच जे लोक, संस्था, तसेच समूह किंवा अन्य कोणी ध्वजसंहितेनुसार ध्वजाचा मान राखत नाहीत त्यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीची निवेदने हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ठाणे भागातील चितळसर मानपाडा, कापूरबावडी, कासारवडवली, नौपाडा, कोपरी, ठाणे नगर, राबोडी तसेच कळवा आणि डोंबिवली येथील विष्णु नगर, राम नगर या पोलीस ठाण्यांत देण्यात आली. तसेच याच आशयाची प्रबोधनात्मक निवेदने ठाणे जिल्ह्यांतील २१ शाळा आणि ३ शिकवणीवर्गांत देण्यात आली. विविध ठिकाणी ही निवेदने देताना हिंदू जनजागृती समितीच्या प्रतिनिधींसह राष्ट्रप्रेमी नागरिकही सहभागी झाले होते.
‘‘मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिलेच आहेत. त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याविषयीची जनहीत याचिका (१०३/२०११) हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. याच समवेत महाराष्ट्र शासनानेही राज्यात ‘प्लास्टिक बंदी’चा निर्णय घेतला आहे. त्यानुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते. ‘तिरंगा मास्क’ हे देशप्रेम प्रदर्शनाचे माध्यम नाही, तर ध्वजसंहितेनुसार ‘राष्ट्रध्वजाचा अशा प्रकारे उपयोग करणे’, हा ध्वजाचा अवमानच आहे, तसेच ‘राष्ट्र गौरव अपमान निवारण अधिनियम १०७१’चे उल्लंघन आहे’’, असेही या निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समिती गेली १९ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या विषयावर व्याख्याने आणि प्रश्नमंजुषा घेणे, राष्ट्रीय प्रतिकांचे पत्रके, फ्लेक्स, होर्डिंग तसेच सोशल मिडीया आदी माध्यमांतून महत्त्व सांगणे, पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री रोखण्यासाठी प्रयत्न करणे आदी कृती केल्या जातात. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या क्रांतिकारकांनी या राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेसाठी आपल्या प्राणाचे बलीदान दिले. त्यांच्या या बलीदानाचे स्मरण करून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य बजावावे, असे आवाहन समितीच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले आहे.
463 total views, 1 views today