केडीएमसीच्या ग्रंथ प्रदर्शनात सार्वजनिक वाचनालयाचा होता स्टॉल
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनात सार्वजनिक वाचनालयाच्या तत्काळ सभासद योजनेत ६० हून अधिक वाचकांनी सदस्यत्व स्वीकारले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने साजरा करताना गेल्या २८ वर्षात प्रथमच ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन २० व २१ जानेवारी रोजी करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. हे औचित्य साधून १५६ वर्ष जुन्या कल्याणच्या सार्बजनिक वाचनालयाने इतिहासात प्रथमच अशा उपक्रमात उत्साहाने सहभागी नोंदवला. कोरोना काळात वाचक वाचनापासून दुरावले होते आणि वाचनाअभावी हा १० ते १२ महिन्याचा काळ मानसिक ताणतणावातून अनुभवावा लागला. वाचक व पुस्तक यांच्यातील दरी भरून निघावी तसेच कोरोनाने सर्वांवर केलेले मानसिक आघात यातून बाहेर पडण्यासाठी तसेच वाचकांना पुस्तके वाचायला मिळावीत व याचनाचे महत्व वाढावे म्हणून सार्वजनिक वाचनालयाने ‘तत्काळ सभासद योजना जाहीर केली.
कल्याणाकर वाचकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत ६० हून अधिक वाचकांनी या वाचनालयाचे सदस्यत्व स्वीकारले. सुविद्य आणि विचक्षण वाचक असा लौकिक असणाऱ्या महापालिका आयुक्तांनी सुद्धा सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या दालनात आपला बहुमूल्य वेळ दिला. या अनोख्या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल आयुक्तांचा सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या वतीने सन्मान करण्यात आला. या ग्रंथ प्रदर्शनाला अनेक नामवंतांनी भेटी दिल्या. वाचनालयाच्या सर्व कर्मचा-यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी ग्रंथपाल गौरी देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन केले.
412 total views, 1 views today