१४ कोटी ७९ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान लवकरात लवकर देण्याची राष्ट्रवादीचे प्रशांत माळी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कल्याण : सन २०१९ – २०२० मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या अनेक नागरिकांना अद्यापही मदत भेटली नसून वर्ष उलटूनही नागरिक शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. अशा या नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी १४ कोटी ७९ लाख ४० हजार अनुदानाची आवश्यकता असून हे अनुदान लवकरात लवकर देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकर्ते प्रशांत माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
कल्याण तालुक्यातील अनेक भागात हजारो लोकांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट मागीलवर्षी आले होते. त्यामध्ये अनेक लोकांची घरेदारे उध्वस्त झाली. तसेच काही लोकांचे हजारो रुपयांच्या घरातील सामुग्रीचे नुकसान झाले होते. अन्नधान्याचा कणही घरात उरला नव्हता. त्या काळात तहसीलदार कार्यालयामार्फत या नुकसानाची तपासणी करून हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. त्यानुसार १८ कोटी २८ लाख १० हजार अनुदान प्राप्त झाले होते. त्यांचे नागरिकांना वाटप करण्यात आले. मात्र अद्यापही अनेक लोकं या मदतीपासून वंचित असून अशा या नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई देण्यासाठी आणखी १४ कोटी ७९ लाख ४० हजार अनुदानाची आवश्यकता आहे.
याबाबत कल्याण तहसीलदार कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे हे अनुदान मिळण्यासाठी वर्षभरापूर्वी पत्र पाठविण्यात आले होते. मात्र वर्षभराचा कालावधी उलटून देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे अनुदान प्राप्त झाले नाही. सध्या कोरोना महामारीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यमुळे नागरिकांना आता नुकसानभरपाई मिळाल्यास या कुटुंबाना आर्थिक आधार मिळणार आहे. त्यामुळे या नागरिकांचा विचार करता लवकरात लवकर उर्वरित अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकर्ते प्रशांत माळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
443 total views, 1 views today