कल्याणसारखे रस्ते अख्या महाराष्ट्रात कुठे नसतील

महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा सत्ताधारी शिवसेनेला टोला

कल्याण : कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्याची दुर्दशा ही सर्वांना परिचित आहे. राज्याचे  गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड  हे कल्याणच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी कल्याण सारखे रस्ते अवघ्या महाराष्ट्रात नसतील असं म्हणत मित्रपक्ष असलेल्या सत्ताधारी शिवसेनेला टोला लगावला.
कल्याण पश्चिममध्ये राष्ट्रवादीच्या वतीने क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्याच्या उद्घाटनासाठी जितेंद्र आव्हाड कल्याणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी कल्याणमधील रस्त्यांबाबत चिंता व्यक्त केली. कल्याणमध्ये आल्यावर रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही, तरुणांनी काही तरी विचार केला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रात असे रस्ते कुठेही नसतील, असं वक्तव्य करीत त्यांनी कल्याण डोंबिवलीतील विकास कामांवर थेट प्रश्न उपस्थित केला.
विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर हे देखील मंचावर उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये गेले अनेकवर्षे शिवसेना व भाजपाची सत्ता आहे आणि कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या सेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे वक्तव्य केल्याने शिवसेनेला टोला लगावल्याची चर्चा रंगली आहे.
यापूर्वी सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवलीबाबत ‘अस्वच्छ शहर’ म्हणून वक्तव्य केले होते आणि भाजपाला घरचा अहेर दिला होता. त्यामुळे आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने शिवसेनेला रस्त्यांच्या दुरावस्थेवरुन कानपिचक्या मारल्याने आव्हाडांनीही सेनेला घरचा अहेरच दिला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
येत्या काही महिन्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक असल्याने रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. अंबरनाथमध्ये काही महिन्यांपूर्वी आव्हाड यांनी महाविकास आघाडीविषयीच बोलताना ‘येणाऱ्या काळात काय होईल हे सांगता येत नाही. परंतु, आता तरी ते आपले मित्र असल्याने त्यांच्यावर टीका करता येत नाही. परंतु, येणारा काळ अवघड असून युती होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तयारी कायम ठेवा’, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. अंबरनाथ येथे सेनेची सत्ता आहे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेमध्येही सेनेची सत्ता आहे, त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होईल का? हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 431 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.