कॅटने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली व्हॉट्स अप विरोधात याचिका

व्हॉट्सअपच्या नव्या नियमांमुळे भारतीय नागरिकांना घटनेने दिलेल्या अधिकारांवर गदा येत असल्याचा केला आरोप

मुंबई : कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्हाट्सअपच्या गोपनियतेशी संबंधित नवे नियम रद्दबातल करण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. व्हाट्सअपच्या नव्या नियमांमुळे घटनेने भारतीय नागरिकांना दिलेल्या विविध महत्वाच्या अधिकारांवर गदा येत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. देशातील नागरिक आणि व्यावसायिकांची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी व्हॉट्सअप सारख्या बड्या उद्योजकांकरता केंद्र सरकारला धोरण आखण्यासाठी सूचना करावी अशी विनंती या याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला केली असल्याचे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
कॅटने या याचिकेत पौर्वात्य देश आणि भारतीयांसाठी केलेल्या गोपनियतेच्या नियमांतील फरकांमुळे भारतीय युझर्सच्या गोपनीय माहितीचा अद्ययावत तंत्रज्ञान वापरणाऱ्या आस्थपना कसा गैरवापर करु शकतात याकडेसर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले आहे असे सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले. कॅटचे विधी सल्लागार  ऍडव्होकेट विवेक नारायण यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. व्हॉटसअपने भारतात प्रवेश करताना युझर्सची माहिती गुप्त ठेवली जाणार असल्याचे सांगत भारतीयांना आपल्याकडे आकर्षित केले होते. २०१४ साली फेसबुकने व्हॉट्स अप वर ताबा मिळवल्यानंतर आपली गोपनीय माहिती उघड होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. फेसबुकवर नियंत्रण मिळवल्यावर गोपनीयतेचे नियम बदलणार नसल्याचे व्हॉट्स अपने जाहीर केले होते. पण २०१६ पासून व्हॉट्स अपने गोपनियतेसंदर्भातील आपल्या नियमांना तिलांजली देत युझर्सची माहिती इतर कंपन्यांना पुरवली होती. त्यामुळे भारतीय नागरिक आणि व्यावसायिक हित अबाधित राखण्यासाठी कॅटने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे सुरेशभाई ठक्कर म्हणाले .

 380 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.