व्याख्यानमाला सप्तरंगाची…

गेली ३५ वर्ष प्रकाश फडके हे रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेला हजेरी लावत आहेत. त्यांच्या नजरेतून त्यांनी घेतलेला व्याख्यानमालेचा हा आढावा


‘ता ना पि ही नी पा जा’
या सप्तरंगाने तयार होणारे आकाशातील इंद्रधनुष्य आपल्याला मोहीत करते, आनंद देते. तशीही सात दिवसांची वेगवेगळे विषय असलेली रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगणात संपन्न होत असते. यंदाचे हे ३५ वे वर्ष आहे. रामभाऊ स्मृती व्याख्यानमाला म्हणजे सात सुगंधित पुष्पांचा पुष्पगुच्छ. व्याख्यान संपल्यानंतरही त्याचा सुगंध दरवळत असतो.
या व्याख्यानमालेचे नाव आहे रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला. या नावातच या व्याख्यानमालेचे यश आहे. कदाचित नवीन पिढीला प्रश्न असू शकतो की कोण हे रामभाऊ म्हाळगी..? रामभाऊ हे राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सेवक, काही काळ संघाचे प्रचारक, यानंतर जनसंघ (भा.ज.पा) या राष्ट्रीय पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ता. सर्व वेळ पक्षासाठी देत असत. दोन-तीन वेळा पुण्यातून महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडूण आले होते. सर्व राजकीय पक्षात त्यांच्याबद्दल आदर होता. आणीबाणीत १९७५ मध्ये तुरुंगवासही भोगला. १९७७ मध्ये लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या. पुण्यातून मोहन धारीया यांना उमेदवारी देण्यात आली. तर पुणेकर रामभाऊंना नवीन तयार झालेल्या ठाणे लोकसभा मतदार संघात निवडणूकीसाठी उभे करण्यात आले. व या निवडणूकीत रामभाऊ प्रचंड मतांनी निवडून आले.
रामभाऊ शिस्तीचे, वक्तशीर, निष्पृह, अभ्यासू व सातत्याने जनसंपर्क ठेवणारे. ठाणे लोकसभेचे नेतृत्व करीत असताना मराठवाड्याचे प्रश्न सोडविण्यासाठी संभाजीनगरला त्यांनी कार्यालय सुरु करुन तिथे ते नेहमी जात असत. खासदार असतानाच त्यांचे दु:खद निधन झाले.
रामदास स्वामींनी म्हटले आहे शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे कैसे वागणे या प्रमाणे रामभाऊंचा संस्कार जपण्याचा व्याख्यानमालेच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. कार्यक्रम पत्रिकेतच टीप असते की कार्यक्रम वेळेवर सुरु होईल. वाहतूकीमुळे अपवादात्मक उशीर झाला तर. पण श्रोत्यांना कार्यक्रम सुरु होईल की नाही अशी चिंता नसते. हिंदू धर्मात अधिकमासात सण मागे पुढे होतात. पण रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला  ठरलेल्या तारखेप्रमाणे, ठरलेल्या कालावधीत, ८ ते १४ जानेवारी दरम्यान सरस्वती मंदिर शाळेच्या मैदानात वेळ, ठिकाण, सप्ताह यात काही बदल न होता संपन्न होत असते. मंडप व्यवस्था व ध्वनी व्यवस्थेमध्येही आजपर्यंत बदल नाही. नोकरी व्यवसायासाठी लोकलने जायचे असल्याने कार्यक्रम वेळेवर सुरु करुन वेळेवर पूर्ण होत असतो.
मी ठाण्यात नोकरीनिमित्त १९७० मध्ये आलो. तर १९७७ मध्ये भास्कर कॉलनी राहावयास आलो. सरस्वती विद्यालय माझ्या घराच्या जवळ असल्याने गेली ३५ वर्ष सातत्याने व्याख्यानमाला ऐकता आली. गेली ३५ वर्ष खंड न पडता सातत्याने ठरलेल्या कालावधीत, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी सुनियोजित व्याख्यानमाला होत असते. श्रोत्यांनी दाद दिलेली “गर्दीची ही व्याख्यानमाला” असे मला वाटते.
या व्याख्यानमालेत संगीत, साहित्य, सहकार, शैक्षणिक, समाजाशी संबंधित असलेल्या अशा विविध विषयांवर बोलण्यासाठी वक्त्यांना आदराने आमंत्रित केले जाते. सर्वश्री लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, य.दी.फडके, डॉ. श्रीराम लागू, प्रमोद नवलकर, राय शेवळकर, स्वातंत्र्यवीर सावकरांचे अंगरक्षक अप्पा कासार, स्वच्छ प्रतीमेचे सनदी अधिकारी एस.एस.तीनईकर, हे व्यासपीठ सर्व विचार मांडण्यासाठी सर्वांसाठी आहे. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला राजकीय अस्पृश्यता मानत नाही.
अभ्यासपूर्ण वक्ते बोलावले जातात. त्याचप्रमाणे समाजात असलेल्या दु:खांवर चर्चा न करता, हळहळ व्यक्त न करता हे काम आपल्यालाच केले पाहिजे असे समजून ज्यांनी काम केले त्यांचे तोंडूनच त्यांचे अनुभव ऐकवण्यास मिळण्यासाठी डॉ. प्रकाश व डॉ. मंदाताई आमटे, सिंधुताई सकपाळ, नरेंद्र जाधव, पोपटराव पवार, भिक्षेकरांचे डॉक्टर म्हणून ओळख असलेले डॉ. अभिजित व डॉ. मनिषा सोनावणे यांना संयोजकांनी बोलावले आहे. या व्यासपीठावरुन आवाहन केल्याने  सहजपणे सिंधूताईंना अर्थसहाय्यही मिळवून देणारी अशी ही व्याख्यानमाला.
व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी संगीत गप्पांचा कार्यक्रम असतो. अवधूत गुप्ते, सलिल कुलकर्णी, श्रीधर फडके, फैयाज खान, आशा खाडीलकर, महेश काळे यांना आमंत्रित केले आहे. सलिल कुलकर्णी यांच्या अग्गोबाई ढग्गोबाई या गाण्यांवर ताल धरुन मनमुराद बाळगोपाळ नाचले. बाळगोपाळांनाही आनंद देणारी ही व्याख्यानमाला गेल्या ३५ वर्षात २४५ व्याख्याने झाली पण एकही वक्ता पुन्हा बोलावण्यात आला नाही. कारण संयोजक म्हणतात आपला महाराष्ट्र याबाबत समृध्द असल्याने अशी वेळ आली नाही. या व्याख्यानमालेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दररोज व्याख्यानानंतर सात दिवस संपूर्ण वंदेमातरम सुमधूर आवाजात म्हटले जाते. पूर्वी श्रीराम आगाशे यांचा मुलगा म्हणत असे. आता रुचा उतेकर, डॉ. अश्विनी बापट म्हणत असतात.  वक्ते म्हणतात की, या व्याख्यानमालेत आम्ही व्याख्यान देणे हा आमचा गौरव आहे असे आम्ही समजतो. रामभाऊंबद्दल दोन शब्द बोलून आपल्या विषयांची मांडणी करतात.
या व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी मकरसंक्रांत असल्याने सगळ्यांना तिळगूळ दिला जातो व पुढील वर्षी येण्याचे आमंत्रणही दिले जाते. अशी ही तोंड गोड करणारी तिळाप्रमाणे स्नेह वाढवणारी व ठाण्याचा लौकीक वाढवणारी व्याख्यानमाला.
सुर्यतारे या प्रमाणेच ब्रह्मांडात कोटी कोटी ग्रह आहेत पण पृथ्वीच्या जवळ असलेले तारे आपणांस दिसतात. आमदार संजय केळकर यांच्याशी माझी ४० वर्षाची ओळख आहे. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत मी सातत्याने येतो हे त्यांच्या लक्षात आले म्हणूनच २५ व्या वर्षी व्यासपीठावर बोलावून रामभाऊ म्हाळगींच्या प्रतिमेचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. त्यावेळेस व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून प्रसिध्द अभिनेते सचिन पिळगावकर होते.
गेली ३५ वर्ष ज्ञान यज्ञ अखंड कार्यरत आहे ज्यात व्याख्यानरुपी समिधा वक्ते या ज्ञान यज्ञात टाकत असतात. हा ज्ञान यज्ञ नंदादीपसारखा तेवत राहो त्यासाठी संयोजकांना, कार्यकर्त्यांना उत्साह व बळ मिळत राहो ही सदिच्छा. ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारी व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, शरद पुरोहित,  विद्याधर वैशंपायन, विजय जोशी, सुहास जावडेकर, सुभाष काळे, माधुरी ताम्हाणे, किर्ती आगाशे, गोरे यांचे ठाणेकर श्रोत्यांतर्फे मी आभार मानतो. शिवाय त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कारण रामभाऊंचे अपूरे काम रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला करीत आहे.
रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाले मुळे प्रदेश कोषाध्यक्ष वसंतराव पटवर्धन व सरचिटणीस अरविंद पेंडसे यांची आठवण येते. रामभाऊ यांचे शेवटचे कार्य समाप्त झाले. त्यांची स्मृती राहावी म्हणून वसंत पटवर्धन व अरविंद पेंडसे याच्या आशीर्वादाने हि व्याख्यानमाला सुरु झाली. थंडीचे दिवस होते. कार्यकर्ते शेकोटी करून बसले होते त्यात आताचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, दत्ता कामत, विश्वा आपटे, विद्याधर वैशमपायन, शरद पुरोहित आदी कार्यकर्त्यांनी विचारांची देवाण घेवाण करणारी व्याख्यानमाला सुरु करावी असे ठरविले आणि रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेस सुरुवात झाली. बघता बघता ३५ वर्ष पूर्ण झाली. ठाणेकर नव्हे तर महाराष्ट्रातील श्रोत्यांच्या घरात घर करून बसलेली अशी हि व्याख्यानमाला. 

 467 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.